अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड पोलिस ठाण्याला चार नामांकित पुरस्कार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील गुन्हे तपास आणि उत्कृष्ट कारवाईबाबत दर महिन्याला होणाऱ्या आढाव्यात म्हसवड पोलिस ठाण्याने तब्बल चार पुरस्कार पटकावले आहेत. या यशामागे ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे नेतृत्व आणि ठाम कार्यपद्धती महत्त्वाची ठरली आहे.

ऑगस्ट महिन्यात सोनवणे यांनी आपल्या पथकासह महिलांविरोधातील गुन्ह्यांवर वेगवान कारवाई करत अवघ्या चोवीस तासांत गंभीर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. ही कारवाई जिल्ह्यात आदर्श ठरली. तसेच डायल ११२ वर मिळालेल्या माहितीच्या आधारे चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या आरोपींना पकडून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांनी यश मिळवले.

याचबरोबर सोनवणे यांनी शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. मुलींच्या सुरक्षिततेसाठी गुड टच-बॅड टच या विषयावर मार्गदर्शन, रोड रोमिओविरोधी कारवाई आणि छेडछाड थांबविण्यासाठी जनजागृती अशा उपक्रमांमुळे म्हसवड ठाण्याला सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्पाचा पुरस्कार मिळाला.

Oplus_16908288

मोबाईल शोध मोहिमेतही सोनवणे यांच्या पुढाकारामुळे म्हसवड ठाण्याने सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर करून शंभरहून अधिक हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत दिले. या कामगिरीबद्दल विशेष प्रशस्तिपत्रक देऊन ठाण्याचा गौरव करण्यात आला.

या सर्व उल्लेखनीय कामगिरीमुळे साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत उपस्थित होते.

सोनवणे यांच्या सोबत कर्मचारी देवानंद खाडे, सतीश जाधव, राहुल थोरात, हर्षदा गडदे, संतोष काळे, महावीर कोकरे, विनोद सपकाळ, वसीम मुलाणी आदींनी खांद्याला खांदा लावून दिलेल्या योगदानामुळे म्हसवड पोलिस ठाणे आज जिल्ह्यातील आदर्श ठाण्यांपैकी एक ठरले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *