म्हसवड पोलिसांची वाळू माफियांवर कारवाईची ‘रेड झोन’ मोहीम — ७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) :
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू उपसावर पुन्हा एकदा कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिरताव ते देवापूर रस्त्यावर लक्ष्मीआई मंदिराजवळ एका लाल रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व त्यामधील वाळू असा एकूण ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरताव येथील सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे याच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाणे गु.र.नं. 201/25, भा.दं.सं. 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई केल्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, तसेच पोलीस कर्मचारी अमर नारनवर, मैना हांगे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, अनिल वाघमोडे, वसीम मुलाणी यांच्या संयुक्त पथकाने केली.
पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाया सुरू ठेवत परिसरात कायद्याचा धाक निर्माण केला आहे.