म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : २२.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड पोलिसांनी वेगवान व अचूक तपास करत अवघ्या बारा तासांत शेतीमाल विक्रेत्यांना मारहाण करून लुटणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुणे व मध्य प्रदेश येथील व्यापाऱ्यांना मालाच्या ऑर्डरच्या बहाण्याने म्हसवड येथे बोलावून जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल २२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर.के. ड्रीप अँड मल्चिंग प्रोडक्शन, पुणे या कंपनीकडून ठिबक सिंचन पाईपचा माल मागवून अज्ञात व्यक्तींनी व्यापाऱ्यांना म्हसवड येथे बोलावले. तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे अशोक लेलँड वाहनातून माल घेऊन म्हसवड येथे आले असता माळशिरस रोडलगत भाटकी गावाजवळील माळरानावर दोन आरोपी बुलेटवर आले. त्यांनी तक्रारदार व सहकाऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत माल उतरवून घेतला व पिकअपमधून पळ काढला.
या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपास पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासातून आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेले आरोपी
- जनार्दन विलास लोखंडे (अकलूज)
- किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार (अकलूज)
- विजय गोरख शिंदे (निमगाव टेंभुर्णी, माढा)
पोलिसांनी तातडीने सोलापूर जिल्ह्यात धाड टाकून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने व चोरलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या टोळीने मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यालाही अशाच प्रकारे लुटल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अवघ्या बारा तासांत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पुणे व मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनी म्हसवड पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
मार्गदर्शन व तपास पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पो.उ.नि. अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलाणी व धीरज कवडे यांनी पार पाडली.

