म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी फक्त ५ तासांत ट्रॅक्टर चोरी उघडकीस – आरोपीसह ८ लाख ५० हजारांचा ट्रॅक्टर जप्त
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी दाखवत नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. हिंगणी (ता. माण) येथील शेतकऱ्याचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर केवळ पाच तासांत शोधून काढत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरीला गेलेला ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर पोलिसांनी गोंदवले बुद्रुक येथील चिक्कू बागेतून शिताफीने जप्त केला.
घटनेची अधिक माहिती अशी अनिल विष्णू माने, रा. हिंगणी यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांचा ट्रॅक्टर (क्र. MH-11 CW-3985) हा त्यांच्या घराजवळून अज्ञात चोरट्याने पळविला. बराच शोध घेतल्यानंतरही ट्रॅक्टर न सापडल्याने अखेर वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा धनाजी पुनाजी लोखंडे (रा. दिवड, ता. माण) याने केल्याचे स्पष्ट झाले. तातडीने पथकाने आरोपीस पकडले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चोरीचा ट्रॅक्टर गोंदवले बुद्रुक येथील चिक्कूच्या बागेत लपवून ठेवल्याची कबुली दिली.
पोलिसांनी पथकासह त्या ठिकाणी धाव घेत ८.५० लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे.
अवघ्या पाच तासांत चोरीचा ट्रॅक्टर आणि आरोपी दोघेही पोलिसांच्या ताब्यात आल्याने तक्रारदारासह नागरिकांनी म्हसवड पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी वाघमारे, अमर नारनवर, मैना हांगे, वसीम मुलानी, विकास ओंबासे व संतोष काळे यांनी पार पाडली.

