म्हसवड पोलीस स्टेशन ‘अधिकाऱ्याविना’; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, ता. माण (प्रतिनिधी)

माण तालुक्यातील सर्वात मोठे व महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसवड येथील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कायमस्वरूपी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या ठिकाणी अधिकारीच नसल्याने कामकाजावर परिणाम होत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

म्हसवड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ लहान-मोठ्या गावांचा समावेश असून ८ बीटमध्ये विभागलेले हे क्षेत्र आहे. येथे ५१ पोलीस कर्मचारी कार्यरत असले तरी केवळ एक पी.एस.आय. आणि एक ए.पी.आय. अशी अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी ए.पी.आय. अक्षय सोनवणे यांची अचानक बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, पोलीस स्टेशनचे कामकाज ‘रामभरोसे’ सुरू असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.

दरम्यान, शहरात ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंती आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर अधिक असते. अशा पार्श्वभूमीवर जयंतीपूर्वीच सक्षम व जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

म्हसवड हे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बालेकिल्ल्यातील महत्त्वाचे शहर असल्याने या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

“जयंतीपूर्वी अधिकारी द्या!”
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनला तातडीने सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *