म्हसवड पोलीस ठाण्याची जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी जुलै 2025 मध्ये म्हसवड पोलीस ठाणे ठरले सातारा जिल्ह्यातील ‘बेस्ट पोलीस स्टेशन’
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
माण तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या म्हसवड पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली भक्कम छाप सातारा जिल्ह्यात उमटवली आहे. माहे जुलै 2025 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हसवड पोलीस ठाण्याला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरविण्यात आले.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कार्याचा आढावा घेऊन, जनतेच्या हितासाठी झालेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव क्राईम कॉन्फरन्समध्ये केला जातो. त्याअंतर्गत म्हसवड पोलीस ठाण्याने विविध आघाड्यांवर केलेल्या कार्यासाठी हा सन्मान पटकावला.

जुलै महिन्यात म्हसवड पोलिसांनी सर्वाधिक मुद्देमाल निर्गती करून तो तक्रारदार, फिर्यादी व साक्षीदारांच्या हाती सुपूर्द करण्याचे काम केले. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन, ‘गुड टच-बॅड टच’ विषयावरील जनजागृती, रोड रोमिओवर कठोर कारवाई या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे म्हसवड पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार देखील प्राप्त झाला.

याचबरोबर महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्याचा तपास अवघ्या 24 तासांत पूर्ण करून सर्व पुरावे गोळा करीत माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या तत्पर आणि प्रभावी कामगिरीबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास प्रशंसापत्र व प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ही यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शशिकांत खाडे, रूपाली फडतरे, सतीश जाधव, राहुल थोरात व हर्षदा गडदे या टीमने केली. सलग उत्कृष्ट कामगिरीमुळे म्हसवड पोलीस ठाणे दर महिन्याला जिल्हा क्राईम कॉन्फरन्समध्ये पुरस्काराचे मानकरी ठरत आहे.
🔹 सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमच्या धडाकेबाज कामगिरीमुळे म्हसवड पोलीस ठाण्याचे नाव पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठाण्यांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचले आहे.

