म्हसवड पालिका निवडणूक : नगराध्यक्ष पदावर तिरंगी तर सदस्य पदावर दुरंगी लढत निश्चित
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, दि. २२
म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस ठरला आणि यानंतर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या दोन अपक्षांसह एकूण १५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने बहुतांश प्रभागात लढत दुरंगी झाली आहे. तरीही नगराध्यक्ष पदासाठी मात्र भाजप – राष्ट्रवादी – बसपा असा तिरंगी मुकाबला रंगणार आहे.
नगराध्यक्ष पदावरून दोन अपक्ष बाहेर; तिन महिलांमध्ये थेट टक्कर
अंतिम यादीतून अपक्ष सौ. गौरी माने व हिंदमालादेवी राजेमाने यांनी माघार घेऊन स्पर्धेला निरोप दिला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी खालील तिन उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे—


पूजा सचिन विरकर – भाजप

रुपाली वाल्मिक सरतापे – बसपा
या तिनही महिला उमेदवारांच्या टक्करमुळे नगराध्यक्ष पदाची लढत रंगतदार बनली आहे.
१५ नगरसेवक उमेदवारांचा माघार… बहुतेक प्रभागात दुरंगी लढत पक्की
आज १५ नगरसेवक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक प्रभागात थेट दोनच उमेदवार रिंगणात राहिले असून सरळ दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १ ते १० मधील एकूण १५ माघारींनंतर २१ जागांसाठी ४६ उमेदवार अंतिम मैदानात राहिले आहेत.
शेखर गोरे यांच्या गटाची मोठी माघार; राजकीय गणितांमध्ये उलथापालथ
अर्ज भरण्याच्या काळात जिल्हा बँकेचे संचालक, युवा नेते शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांतून भाजप व अपक्ष अशा दुहेरी अर्जांनी खळबळ उडवली होती. परंतु भाजपचे जोडपत्र न मिळाल्याने भाजपच्या नावाने दाखल केलेले सर्व अर्ज बाद झाले.
आजच्या माघारीच्या दिवशी गोरे यांच्या सर्वच उमेदवारांनी निवडणुकीतून मागे हटल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या माघारीनंतर मैदानात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा मुख्य सामना स्पष्टपणे उभा राहिला आहे.
दि. १८ रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत—
नगराध्यक्षपदासाठी दाखल १२ अर्जांपैकी ७ अर्ज बाद, तर ५ अर्ज वैध ठरले.
यापैकी दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने तिरंगी स्पर्धेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बहुतांश प्रभागात दुरंगी लढतीचे चित्र तयार झाले असले तरी काही प्रभागात तिरंगी लढत कायम राहणार आहे. त्यामुळे म्हसवड पालिकेची निवडणूक केवळ पक्षांमधील नव्हे तर गटांमधील प्रतिष्ठेचीही ठरणार आहे.

