म्हसवड नगरपरिषदेचा उपक्रम : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) –प्रतिनिधी

“माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन म्हसवड नगरपरिषदेने केले आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कार्यालयात पंचतत्त्वांवर आधारित (पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश) आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीतून जलवायू बदल, ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषणाचे परिणाम जनतेसमोर दृश्यरूपात मांडण्यात आले असून, नागरिकांना पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यावेळी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावट तसेच पर्यावरणस्नेही विसर्जनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी खास “सेल्फी पॉईंट”ची निर्मिती करण्यात आली असून, नागरिकांनी फोटो सोशल मीडियावर शेअर करून संदेश अधिकाधिक पसरवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पारंपरिक ठिकाणी तसेच कृत्रिम हौद, तलाव व नदीपात्रांमध्ये स्वच्छतेची सोय करण्यात आली आहे. शाडू मातीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष हौद तर पीओपी मिश्रित मूर्तींसाठी स्वतंत्र टाक्या उभारण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागांत १, ५, ७ व १० दिवसांच्या विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा, सुरक्षा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहतील. माणगंगा नदीपात्रात रबरी बोटींसह आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात राहणार आहे.

नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, “पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छतेची जबाबदारी ही सामूहिक आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मोहिमेला सहकार्य करावे.”

ही मोहीम माझी वसुंधरा अभियान ६.०, स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व LiFE मिशन अंतर्गत राबवली जात आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *