माणचे सुपुत्र वैभव पोरे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर…! मुंबईत दि.5 सप्टेंबर रोजी मान्यवरांचे हस्ते वितरण
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्यातील म्हसवड गावचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्र राज्य शासनाने घेत यावर्षीचा सन 2022-2023 शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.
वैभव पोरे हे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील जि.प.शाळेत आपले ज्ञानदानाचे कार्य करत असून उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख आहे.विदयार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकासनावर भर ,शालेय विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणी पुणे येथे- बालोद्यान अंतर्गत विद्यार्थ्याचे अनेक कार्यक्रम व राज्यभर प्रसारण , संपूर्ण शाळेत डिजिटल ई लर्निंग माध्यमाद्वारे प्रभावी शिक्षण,इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर विशेष काम केले आहे.राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक व एम.एस.सी.ई.आर.टी पुणे येथे विविध साहित्य निर्मिती-लेखनात सहभाग घेतला आहे.शालेय भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी एनजीओ मार्फत शाळेला भरघोस मदत प्राप्त केली आहे. शालेय सांस्कृतिक क्रिडा-कला स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर यश प्राप्त झाले आहे तर विविध उपक्रम व गुणवत्ता सुधार यामुळे शाळेची पटसंख्या कायम वाढलेली असते.राज्यातील ४००० शाळा व २ लाख ७८ हजार ५०० विद्यार्थ्यांसाठी ४० कोटी रु.चे मदतकार्य मिळवून देण्यात मुख्य समन्वयकाची भूमिका बजावली आहे.
माण तालुक्यातील विविध शाळांना भौतिक सुविधा,विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू,कपडे,अन्नधान्य,सायकल , संगणक, आरोग्य सेवा , रुग्णवाहिका , वैद्यकीय उपकरणे आदी विविध वस्तू स्वरूपात सर्वतोपरि मदत करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.विविध संस्था,एनजीओच्या माध्यमातून त्यांनी
आपल्या माण तालुक्यात वेळोवेळी मदत आणून मोठे सामाजिक कार्य केले आहे.
त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आज पर्यंत जिल्हास्तरीय,विभागीय स्तरावर कुमुद बन्सल पुरस्कार , नवोपक्रम पुरस्कार,प्रबोधन मित्र पुरस्कार,माणदेश गौरव पुरस्कार यासारखे विविध शेकडो पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.याच कार्याची दखल राज्य शासनाने ही घेऊन त्यांची क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.दि.5 सप्टेंबर रोजी मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
वैभव पोरे यांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच माण तालुक्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

चौकट – पुणे जिल्हा ही माझी कर्मभूमी असली तरी माण तालुका ही माझी जन्मभूमी आहे.आपल्या मातृभूमीचे आपण देणे लागतो म्हणून तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था,एनजीओ, थोर देणीदार यांच्या माध्यमातून मदत आणण्याचे काम करत आहे.शासनाच्या या पुरस्काराने अजून चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून हे कार्य आपण अविरतपणे सुरू ठेवणार आहे.
– वैभव पोरे ,उपक्रमशील शिक्षक