मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उंब्रजमध्ये सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज प्रतिनिधी
मुंबई येथे संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला उंब्रज विभागातील सकल मराठा समाजाने जोरदार पाठिंबा दर्शविला. रविवारी उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. शिवडे, शिवाजीनगर मांगवाडी, कळमकरवाडी, अंधारवाडी, चरेगाव, उंब्रज व परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी हजेरी लावून आंदोलनाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, “आरक्षण आमचा हक्क आहे, कुणाच्या बापाचं नाही”, “या सरकारचं करायचं काय – खाली मुंडी वर पाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करून आरक्षण द्यावे, अन्यथा समाजबांधव प्रत्येक गावात संघटित होऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच गुणरत्न सदावर्ते व लक्ष्मण हाके यांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घालावा, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनाच्या वेळी उपस्थित मराठा बांधवांनी समाजाच्या एकतेचा आणि हक्कासाठीच्या लढ्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे उंब्रज परिसरात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत उत्स्फूर्त वातावरण निर्माण झाले होते.

