लाच मागणाऱ्या मंडलाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले – सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी – सादिक शेख, सातारा |
साताऱ्यातील खिंडवाडी (ता. जि. सातारा) येथील शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मंडलाधिकारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घटनेचा तपशील असा आहे की :
खिंडवाडी येथील गट नं. १७/१/१ या शेतजमिनीच्या दस्तावेजात तक्रारदार हे ‘लिहून घेणारे’ यांच्या वतीने कुलमुखत्यार म्हणून काम करत होते. मूळ मालकांनी ६० गुंठे जमिनीतून १३ गुंठ्यांची विक्री केली, मात्र ती विक्री फेलो असल्याचे आढळले. उर्वरित ४७ गुंठ्यांपैकी १० गुंठ्यांची पुनर्विक्री झाली. त्यानंतर ही नोंद तलाठी कार्यालयाने ७/१२ वर घेतली.
तक्रारदारांनी याविरोधात मंडलाधिकारी कोडोली यांच्याकडे आक्षेप नोंदवला, जो मान्य करण्यात आला आणि नोंद स्थगित करण्यात आली. मात्र, २२ मे २०२५ रोजी मंडलाधिकारी घाडगे यांनी सदर फेरफार रद्द केल्याची माहिती देत, त्या कामासाठी व उर्वरित ४७ गुंठ्यांची नोंद घेण्यासाठी एकूण १ लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल झाली. घडलेल्या व्यवहारानुसार प्रथम ७५,००० रुपये आणि नंतर उर्वरित २५,००० रुपये लाच म्हणून देण्याचा व्यवहार ठरला. पहिल्या टप्प्यातील ७५,००० रुपये स्वीकारताना मंडलाधिकारी घाडगे यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाईत पोलीस उपअधीक्षक – राजेश वाघमारे,पो. हवा. नितीन गोगावले,पो. हवा. गणेश लाटे,पो. हवा. निलेश राजपूरे या पथकाने केली
नागरिकांना आवाहन :
लाच मागणीसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास कृपया राजेश वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा मोबाइल क्रमांक: ९७६३४०६५०० या संपर्कावर त्वरित कळवावे