जीवनात उच्च ध्येय ठेवा : डॉ. जगन्नाथ वीरकर
म्हसवड प्रतिनिधी :
जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय ठेवा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर जगन्नाथ वीरकर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत क्रांतिवीर जूनियर कॉलेज म्हसवड येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.तसेच नागपूर येथे समृद्धी महामार्ग उपक्रम अंतर्गत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी डॉ.जगन्नाथ वीरकर यांचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रित्यर्थ म्हसवड येथे त्यांचा सत्कार आयोजित केला होता.यावेळी संस्था अध्यक्ष प्रा .विश्वंभर बाबर, शिक्षक बँकेची माजी संचालक लक्ष्मण काळे, संस्था सचिव सुलोचना बाबर, तसेच संकुलातील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जगन्नाथ वीरकर म्हणाले माण ही नर रत्नाची खाण आहे.या तालुक्यातील अनेक मान्यवरांनी राज्याच्या प्रशासनात वैशिष्ट्यपूर्ण काम केलेले आहे.
राज्यस्तरीय माझा सन्मान हा माण तालुक्याचा सन्मान असल्याचे विरकर यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना डॉ.
विरकर म्हणाले यशस्वी जीवनाची पायाभरणी शालेय स्तरावरच होत असते.त्यासाठी जिद्द चिकाटी व नियोजन महत्त्वाचे असते.उच्च ध्येय गाठण्यासाठी खडतर परिश्रमाला पर्याय नाही. भविष्यातील करिअर बाबत शालेय स्तरावरच नियोजन करून वाटचाल करणे गरजेचे आहे.स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी जोपासणे गरजेचे आहे.नेहमी सकारात्मक राहून परिस्थितीवर मात करा. थोरा मोठ्यांचे चरित्र अभ्यासून प्रेरणा व प्रोत्साहन मिळवण्याचे आवाहन विरकर यांनी केले.
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थे मुळे मी घडलो.श्रमसंस्कार हा रयत शिक्षण संस्थेचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आई-वडिलांचे प्रोत्साहन व गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच मी आज तुमच्या पुढे उभा आहे.विद्यार्थ्यांनो आई वडील व गुरुजनांचा आदर ठेवा.आपण समाजाचं देणं लागतो याचेही भान ठेवा .केवळ अधिकारी पद सर्वस्व नसून आदर्श नागरिक बनण्याचे ध्येय ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या शालेय जीवनातील दारिद्र्याचा जीवनपट व चित्तरकथा विद्यार्थ्यांसमोर मांडताना डॉ. विरकर सद्गदित झाले.यावेळी अनेकांनाआपले अश्रू आवरता आले नाहीत.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमशीलते बाबत गौरव करून या संकुलाला उज्वल भवितव्यअसल्याचे विरकर यांनी सांगितले.या निमित्ताने डॉक्टर विरकर यांनी विद्यार्थ्याबरोबर संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
प्रास्ताविक संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी करून संस्थेबाबतची माहिती दिली.सूत्रसंचालन प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार प्रा. समाधान चव्हाण यांनी व्यक्त केले.