उर्वरीत आयुष्य माण – खटावसाठी अर्पण – आ. जयकुमार गोरे |
म्हसवड दि.
माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माण – खटावच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे आणि जनतेच्या आशिर्वादामुळे परमेश्वराने मोठ्या संकटातून वाचवुन मला पुन्हा तुमच्या सोबत पाठवलय. माझा हा पुनर्जन्म आहे यापुढील माझे हे नवीन आयुष्य माझ्या माण – खटावच्या मातीसाठी, जनतेसाठी अर्पण करणार असे भावनिक उद्गगार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी काढले.
१२ दिवसांपूर्वी फलटण येथील भीषण अपघातात जखमी झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांना उपचारानंतर गुरुवारी पुणे येथून एअर ॲंबुलन्सने बोराटवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. भीषण अपघातातून बचावलेले जयाभाऊ सुखरूपपणे घरी आलेले पहाताच माण – खटावमधील हजारोंच्या संख्येने जमलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अबाल वृध्दांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करत , पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.
यावेळी अत्यंत भावुक होत आ. गोरे म्हणाले की इतक्यात मला कुणी घेऊन जावू शकत नाही. अजून मला खूप लढाया लढायच्या आहेत, खूप संघर्ष बाकी आहे. आजपर्यंत जनतेची सेवा करत आलोय. मतदारसंघात अनेक कामे झाली पाहिजेत म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करत आलोय. सर्वांच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा आयुष्य मिळालेय. मिळालेले आयुष्य जनतेच्या सेवेत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे भावनिक उद्गगार त्यांनी काढताच गोरे कुटुंबियांसह जमलेल्या सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
आमच्या माण – खटावचा वाघ मोठ्या संकटावर मात करुन माघारी आलाय. त्याच्या पाठिशी आम्हा बायाबापड्यांचे आशिर्वाद आहेत. जयाभाऊ तारणहार आहे अशा प्रतिक्रिया जमलेल्या अबाल वृध्दांनी उत्स्फूर्तपणे दिल्या.
यावेळी भगवानराव गोरे, सोनिया गोरे, अंकुशभाऊ गोरे, भारतीताई गोरे, अदित्य गोरे, वैष्णवी गोरे आणि गोरे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी आमदार गोरेंना डॉक्टरांनी सक्त विश्रांती घ्यायला सांगितली असल्याने कार्यकर्त्यांनी दोन दिवस भेटायला येवू नये असे आवाहन तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी केले आहे.
चौकट –
जयाभाऊंनी मानले अनेकांचे आभार –
गंभीर अपघात झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दहा मिनिटांत घटनास्थळी पोहचून आ. गोरेंसह इतर जखमींना फलटणमध्ये प्राथमिक उपचार मिळण्याची व्यवस्था केली होती. पुढे पुण्यातही ते आ. गोरेंबरोबर सावलीसारखे उपस्थित होते. बंधू अंकुशभाऊ गोरे भारतीताईंसह सलग बारा दिवस पुण्यातील रुग्णालयात तळ ठोकून होते. पत्नी सोनिया गोरे, मुलगी वैष्णवी गोरे, परदेशातून आलेला मुलगा अदित्य गोरे आणि जयाभाऊंची ताकद असलेले वडिल भगवानराव गोरे या सर्वच गोरे कुटुंबियांनी गेल्या बारा दिवसात तहान भूक विसरुन या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. आ. राहुल कुल आणि सरकारमधील सर्व मंत्री, सहकारी आमदार तसेच मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रार्थना करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचेही आ. गोरे यांनी यावेळी आभार मानले.
चौकट – “एसयूव्ही ज्या खड्ड्यात पडली तो खड्डा किमान ३० फूट खाली होता, त्यामुळे आमदारांच्या छातीत फ्रॅक्चर झाले होते त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.औषधोपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने तसेच फिजिओथेरपीमुळे त्यांना लवकर बरे होण्यास मदत मिळाली.
– डॉ.कपिल झिरपे ,न्यूरो ट्रॉमा युनिट विभाग प्रमुख रूबी हॉल
चौकट –
रुबी हॉलमध्ये दाखल असल्याच्या या दिवसात मला वॉर्ड बॉय, नर्स, केअर टेकर, डॉक्टर्स यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली.या दृष्टिकोनामुळेच माझी पुनर्प्राप्ती अपेक्षेपेक्षा खूप जलद झाली.माझी अत्यंत काळजी घेतल्याबद्दल डॉ.पुर्वेझ ग्रांट,डॉ. झिरपे आणि न्यूरो ट्रॉमा युनिट टीमचा आभारी आहे.”
– आ.जयकुमार गोरे, माण – खटाव.