म्हसवडमध्ये महादेव जानकर यांचा घणाघात : “विकास माझ्या खिशातून नव्हे, जनतेच्या टॅक्सातूनच झाला!”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सचिन मंगरुळे
म्हसवड | प्रतिनिधी
म्हसवड येथील सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या वतीने आयोजित कोपरा सभेत माजी मंत्री महादेव जानकर यांनी थेट टोला हाणत सांगितले की, “मी मंत्री असताना एका वर्षात दीड हजार कोटी नव्हे तर तब्बल साडे १२ हजार कोटींची विकासकामे केली. पण हा पैसा माझ्या घरातील नव्हता; हा जनतेच्या टँक्सातून जमलेला निधी होता. त्यामुळे कोणताही मंत्री ‘मी विकास केला’ म्हणत असेल, तर त्या कामांमध्ये त्यांचा एक रूपयाही खर्च नसतो. मी कधीही मंत्रीपदाचा आव आणला नाही. माझे एकच ध्येय—माण तालुका भयमुक्त व दहशतमुक्त करणे!”
सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या कोपरा सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशिल मोहिते–पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रा. कविता म्हेत्रे, अभयसिंह जगताप, किशोर सोनवणे, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, अरविंद पिसे यांच्यासह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

—
“भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त म्हसवडसाठी जनता एकत्र आली” — महादेव जानकर
यानंतर बोलताना जानकर म्हणाले,
“म्हसवडकरांनी माझ्यावर विश्वास दाखवत भाजपविरोधी आघाडी केली. समविचारी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. नागरिकांना भयमुक्त, दहशतमुक्त म्हसवड पाहिजे. म्हणूनच जनता आज एकवटली आहे. कोरोडॉल प्रकल्पाचा पहिला प्रस्तावही मी एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून पंतप्रधानांसमोर मांडला होता.”
—
धैर्यशिल मोहिते–पाटील : “शहराचा विकास काँग्रेस–राष्ट्रवादीच्याच काळात”
खासदार धैर्यशिल मोहिते–पाटील म्हणाले,
“म्हसवड शहराचा खरा विकास हा काँग्रेस–राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात झाला. राज्यात गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्ता असूनही शहरात नव्या विकासाची कमतरता आहे. माणगंगा नदीवरील पूल, पिण्याचे पाणी, गार्डन हे सर्व तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते–पाटील यांच्याच प्रयत्नांचे फळ आहे.”
ते पुढे म्हणाले,
“आज शहरात ‘मी केलं, मी केलं’ असा नारा दिला जातोय. पण जनतेला भयभीत करून नाही तर विश्वासाने विकास करता येतो. दडपशाही, गुंडगिरी मोडण्यासाठी सुजाण नागरिकांनी सिध्दनाथ नागरिक आघाडीला विजय द्यावा.”
—
प्रभाकर देशमुख यांचा टोलादार हल्ला : “बसस्थानकास १५ वर्षे… अडथळे कोण घालत होते?”
देशमुख म्हणाले,
“शहरातील बसस्थानकाला १५ वर्षे लागली. त्यात अडथळे कोणी आणले हे म्हसवडकरांना आज ठाऊक आहे. एमआयडीसी हवीच, पण शेतकऱ्यांची जमीन ओरबाडून नव्हे. चर्चा करा, संवाद करा, दहशत नको.”
ते पुढे म्हणाले,
“छ. शिवाजी महाराजांकडे हातभर मावळे होते, पण त्यांनी एकीच्या बळावर औरंगजेबाला नामोहरण केले. तसेच म्हसवडमध्येही एकीची वज्रमुठ घडवण्याची आज वेळ आली आहे.”
—
अनिल देसाई : “जे चांगले ते मी केलं, जे वाईट ते दुसऱ्यांनी केलं — हा स्वभाव संपवा”
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आक्षेप घेत सांगितले,
“शहरातील जनतेला प्रशासनाच्या आडून त्रास दिला जातोय. शहराचा विकास मी केला असे सांगणाऱ्यांनी मग येथील पाणी, रस्ते, गलिच्छ व्यवस्था याची जबाबदारीही स्वीकारावी.”
देसाई पुढे म्हणाले,
“परिवर्तन पॅनलवर शिव्या देणारेच आज त्याच कार्यकर्त्यांना मांडीवर घेत बसलेत. उमेदवारी अर्ज भरताना स्वतःच्याच कार्यकर्त्यांना फसवणाऱ्यांवर जनता आता विश्वास ठेवणार नाही. फसवी राजकारण संपवण्यासाठी म्हसवडची जनता एकजूट झाली आहे.”
इतर नेत्यांचा भाजपवर जोरदार हल्ला
शरदचंद्र पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप, प्रा. कविता म्हेत्रे, किशोर सोनवणे, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने यांनीही भाजपवर कडाडून टीका केली.
त्यांनी आवाहन करत सांगितले की,
“शहराचा विकास हा शहराच्या हातात द्या. भीती आणि दडपशाहीपेक्षा एकी व सामर्थ्यानेच बदल घडू शकतो.”
—
भव्य पदयात्रेने उत्साह शिगेला
सभेनंतर सिध्दनाथ नागरिक आघाडीने शहरात भव्य पदयात्रा काढली. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विकासाचा निर्णय शहरवासियांच्या हातात देण्याची घोषणा केली

