सरपंच दिपाली जाधव यांच्या मानधनातून लकी ड्रॉ; वेळेवर कर भरणाऱ्यांना बक्षीस वितरण
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
सातारा, कराड | प्रतिनिधी – कुलदीप मोहिते
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचे वेळेवर कर भरणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन तासवडे (ता. कराड) ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. दिपाली जाधव यांनी आपल्या वैयक्तिक मानधनातून वेळेवर कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी लकी ड्रॉ आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन केले.
हा कार्यक्रम कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) मा. प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यामध्ये एकूण २० भाग्यवान करदात्यांना प्रत्येकी रोख बक्षीस देण्यात आले असून एकूण २० हजार रुपयांचे पारितोषिक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये पं.स. कराडचे अधिकारी माळी साहेब, तासवडेच्या उपसरपंच सौ. मनीषा जाधव, ग्रामसेवक महादेव जाधव, ग्रा.सदस्य सुभाष जाधव, सौ. लता जाधव, सौ. भारती शिंदे, युवा नेते उमेश मोहिते, वहागावचे माजी सरपंच संग्राम पवार, तळबीडच्या सरपंच सौ. मृणालिनी मोहिते आदींचा समावेश होता.
याच कार्यक्रमात ‘कराड मोटर्स अँड प्रोजेक्ट्स (किर्लोस्कर)’ उद्योग समूहाच्या सहकार्याने 3KW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या सौर प्रकल्पामुळे दररोज सुमारे १२ युनिट वीज निर्माण होणार असून, ग्रामपंचायतीला दरमहा २ हजार रुपयांची वीज बचत होणार आहे.
हा उपक्रम ग्रामीण भागातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, गावाचा विकास ग्रामस्थांच्या सहभागातूनच शक्य आहे, हे सरपंच दिपाली जाधव यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.