म्हसवड येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) –
साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त म्हसवड शहरातील मल्हारनगर येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. 31 जुलै रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले, तर 1 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या दिवशी सकाळी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले. या पूजन सोहळ्याला म्हसवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक शहाजी लोखंडे, माजी नगरसेवक शिवाजी लोखंडे, समाजसेवक सचिन लोखंडे, भीमराव मस्के, नाना लोखंडे तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार अण्णा टाकणे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय धट, युवक नेते करण भैय्या पोरे, पत्रकार सचिन सरतापे, दिनेश गोरे, बंटी खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महापुरुषांना अभिवादन केले. या सर्वांनी अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या सामाजिक कार्यावर भाष्य करत, त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज अधोरेखित केली.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे (वही-पेन) वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 105 रोपांचे वृक्षारोपणही करण्यात आले.
सायंकाळी मल्हारनगर येथून अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले होते. कार्यक्रमात सामाजिक एकोपा, प्रेरणादायी विचार व सार्वजनिक सहभागाची प्रचीती सर्वत्र अनुभवायला मिळाली.