महिलांच्या सन्मारार्थ सुरु केलेल्या सर्व योजना पुरेशा निधीची तरतूद करुन आमचे सरकार यापुढेही निरंतर सुरु ठेवणार असल्याची ग्वाही आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी –
महायुती सरकारने राज्यातील लाडक्या माता भगिनींना सक्षमपणे आणि सन्मानाने जगता यावे म्हणून दरमहा दीड हजार रुपये देणारी आणि इतर योजना राबविण्याचा निर्णय पुढील पाच वर्षांसाठी घेतला आहे. विरोधक सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेला विरोध करत आले आहेत. त्यांना ही योजना बंद पाडायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण आणि महिलांच्या सन्मारार्थ सुरु केलेल्या सर्व योजना पुरेशा निधीची तरतूद करुन आमचे सरकार यापुढेही निरंतर सुरु ठेवणार असल्याची ग्वाही आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
माण तालुक्यातील माता भगिनींच्या सन्मारार्थ म्हसवड येथे आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मा. आ. दिलीपराव येळगावकर, अंकुशभाऊ गोरे,सोनिया गोरे, भारती गोरे आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. गोरे पुढे म्हणाले, लाडकी बहीण ही निवडणूक डोळ्यासमोर सुरु केलेली योजना नाही. ही योजना अशीच पुढे सुरु रहाणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवाभाऊंनी दिला आहे. आमचे सरकार कोट्यवधी बहीणींना फक्त दीड हजार रुपये देवून थांबले नाही तर जन्माला येणाऱ्या अठराव्या वर्षी लखपती होणार आहेत. लखपती दिदी, वयोश्री योजना सुरु आहे. एसटी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आहे. मुलींचे उच्च शिक्षणही मोफत होत आहे. तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. महिलांच्या सन्मारार्थ इतक्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत.
आ. गोरे पुढे म्हणाले, माझ्या मतदारसंघात ऊसाचे कांडे पिकत नव्हते. इथल्या जनतेला मात्र मी दुष्काळमुक्तीचे आणि बागायती शेतीसह कारखानदारीची स्वप्ने दाखवली होती. आज १५ वर्षात झालेल्या जलक्रांतीमुळे मतदारसंघात चार चार साखर कारखाने सुरु झाले आहेत. गेल्या १५ वर्षात अथक परिश्रम करुन विविध पाणी योजनांना तब्बल साडेबारा हजार कोटींचा निधी मिळवल्यामुळेच हा सकारात्मक बदल पहायला मिळाला आहे. दुष्काळमुक्तीच्या लढ्याने सुरु झालेली माझी वाटचाल आजही सुरु आहे. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. कायम एकवटलेल्या विरोधकांनी आणि त्यांच्या वरिष्ठांनी माझ्या वाटचालीत नेहमीच अडथळे आणायचे काम केले आहे. प्रचंड मोठ्या अर्थकारणाच्या जीवावर माझ्या पराभवाचे मनसुबे विरोधक नेहमीच रचतात, मात्र माझ्या पाठिशी मतदारसंघातील माता भगिनींचे आशिर्वाद नेहमी राहिले आहेत. याच माता भगिनींच्या आशिर्वादांमुळे मी जीवघेण्या अपघातातून वाचलो. माझी दुष्काळमुक्तीची लढाई पूर्ण करण्यासाठीच परमेश्वराने मला पुढील आयुष्य दिले आहे. यापुढेही आणखी नवी उद्दिष्टे समोर ठेवून मतदारसंघाला विकासाचे रोलमॉडेल बनविण्याचा माझा प्रवास सुरुच राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


