दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
पूर्वीचे राज्यकर्ते पाण्यासाठी दुष्काळी जनतेला फक्त अश्वासनांवर अनेक वर्षे झुलवत ठेवायचे. ते प्रत्येक निवडणूका प्रलंबित पाणीप्रश्नावर लढायचे. आम्ही मात्र निवडणूकीसाठी जनतेला फक्त अश्वासने देत नाही तर तात्काळ निधी देवून दुष्काळी भागाच्या पाणीयोजना पूर्ण करुन जनतेचे आशिर्वाद मागतो. जिहेकठापूर, उरमोडी, तारळी, टेंभू, म्हैसाळ अशा सर्व पाणीयोजना पूर्णत्वाला नेवून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पाणी योजनांसाठी यशस्वी पाठपुरावा करणाऱ्या आ. जयकुमार गोरे आणि खा. रणजीत निंबाळकारांसारखे लोकप्रतिनिधी असावेत असे सांगून त्यांनी दोघांचे जाहीर कौतुकही केले.
गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमप्रसंगी माण तालुक्यातील आंधळी धरण येथे ते बोलत होते. कार्यक्रमाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, ना. महेश शिंदे, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, एसपी समीर शेख, मा. आ. दिलीपराव येळगावकर, मदन भोसले, मनोहर भिडे गुरुजी, मनोज घोरपडे, मकरंद देशपांडे, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी दीपक कपूर, अतुल कपोले, हणमंत गुणाले, डॉ. धुमाळ,अरुण नाईक, निकम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भगवानराव गोरे, अंकुशभाऊ गोरे, सोनिया गोरे, सुरभी भोसले, अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, गणेश सत्रे, चिन्मय कुलकर्णी, नगराध्यक्ष, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, महिला आघाडीच्या पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, माण आणि खटावची जी भूमी वर्षानुवर्षे थेंब थेंब पाण्यासाठी तरसली होती त्या भूमीत आज प्रत्यक्ष पाणी आले आहे. आ. जयकुमार गोरे आणि इथल्या जनतेसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आ. जयाभाऊंनी या पाण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. गेल्या १५ वर्षात ते विधानसभेत आल्यापासून फक्त या भागाच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी लढत आहेत. सुरुवातीला त्यांच्यामुळेच मला जिहेकठापूर, उरमोडीसारख्या योजना माहित झाल्या. सुरुवातीच्या काळात या योजनांना निधी मिळाला नाही, मात्र मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जनतेला मदत करायचे ठरवले होते. आम्ही या भागातील अनेक योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता आणि लागेल तितका निधी देवून वेगाने कामे सुरु केली. माण आणि खटावच्या पाणी योजनांसाठी आ. जयाभाऊंनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या पयत्नांना चांगले यशही आले आहे. जिहेकठापूर योजनेला केंद्राचेही पैसे मिळाले आहेत. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होताना जनतेला प्राण देणारे जिहेकठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आले आहे. आता या भागातील शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. ३ . १७ टीएमसी पाण्याचा वापर होणाऱ्या या योजनेच्या उत्तर माणमधील उरलेल्या गावांसाठीही निधी देणार आहे. दीड वर्षात आम्ही १२१ सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिली आहे. त्यामुळे १५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सातारा, सांगली, सोलापूरच्या दुष्काळी भागाची आम्ही सेवा करत आहोत. उघड्या कॅनॉलमधून पाणी देण्यापेक्षा बंद पाईपलाईनने पाणी देणे सुरु केल्याने आठ टीएमसी पाण्याचे फेरवाटप करता आले आहे. माणमधील कॉरिडॉरचा विषय लवकरच मार्गी लागेल आणि इथेच रोजगारनिर्मिती होईल. आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. पावणेतीन लाख शेतकऱ्यांना ३२२ कोटींचा विमा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, जशी देशाची गॅरंटी पंतप्रधान मोदींनी घेतली आहे तशी आ. जयकुमार गोरेंची गॅरंटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आ. गोरेंनी मागणी केलेल्या पाणी योजनांच्या प्रत्येक कामाला लागेल तितका निधी मिळत आहे. जिहेकठापूरचे पाणी आंधळी धरणात आल्याने आ. गोरेंचे १५ वर्षांपूर्वीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.
खा. रणजीत नाईक निंबाळकर म्हणाले, आज खटाव माणसाठी सोनियाचा दिवस आहे. आंधळी धरणात आलेले पाणी म्हणजे आ. गोरेंनी १५ वर्षे केलेल्या संघर्षाचे फळ आहे. आमच्या सरकारच्या कामाच्या झपाट्यामुळे माण, खटाव, फलटण, माळशिरसह सर्वच तालुक्यांचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र भाजपमय झाला असून या भागात पक्ष मजबूत झाला असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट .……
आंधळी धरणात मान्यवरांचा नौकाविहार ……
चालू वर्षीच्या दुष्काळामुळे आंधळी धरण कोरडे पडले होते. २२ जानेवारीपासून या धरणात जिहेकठापूर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आंधळी धरणात साठले आहे. याच पाण्याचे पूजन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजित नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे आणि मान्यवरांनी आंधळी धरणात नौकाविहाराचा आनंद लुटला. धरणातील बोटीतूनच आकाशात विविध रंगांची उधळण करणारी नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.
चौकट ..…
जयाभाऊ, रणजितसिंहांची स्पीडबोटीतून कार्यक्रमस्थकी धमाकेदार एंट्री…….
जिहेकठापूर योजनेच्या जलपूजन कार्यक्रमासाठी पाण्यात दीडशे फुटांचा रॅम्प बनविण्यात आला होता. सभेचा भव्य मंडपही धरणाकडेलाच उभारण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी आ. जयकुमार गोरे आणि खा. रणजीत निंबाळकर यांची स्पीडबोटीतून येवून व्यासपीठावर धमाकेदार एंट्री झाली. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
चौकट …..
गर्दीचा उच्चांक मोडणारी पाच महिन्यातील दुसरी सभा …..
गेल्या पाच महिन्यांपूर्वी उत्तर माणमधील ३२ गावांसाठीच्या जिहेकठापूर विस्तारीत योजनेच्या भूमीपूजनासाठीना. देवेंद्र फडणवीस दहिवडीत आले होते. त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा झाली होती. काल आंधळी धरण परिसरात झालेल्या सभेलाही जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती होती. ऐन दुष्काळात आंधळी धरणात जिहेकठापूर योजनेचे आलेले पाणी पाहून माणवासियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे पहायला मिळाले.
ReplyForward
|