गणेश तळेकर मुंबई: तरुण रंगकर्मींच्या कलेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित एकांकिका स्पर्धेने रंगकर्मींसह प्रेक्षकांचे लक्ष वेधले. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली बाराव्या वर्षीही ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. नाटककार आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांनी या स्पर्धेला “तरुण रंगकर्मींचा कुंभमेळा” म्हणत आयोजकांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
अशोक समेळ म्हणाले, “रंगभूमीवर नितांत प्रेम असलेल्या प्रकाश देसाई यांच्या सारखी व्यक्तिमत्त्वे असल्यास नाट्यकला प्रत्येक गावात रुजेल. या स्पर्धेतून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळाल्याने भविष्यात रंगभूमीला नवे आयाम मिळतील.”
थंडीच्या कडाक्याला न जुमानता प्रेक्षकांनी पहाटेपर्यंत हाऊसफुल्ल गर्दी केली. रंगकर्मींसाठी भोजन, निवास आणि इतर आवश्यक गोष्टींच्या व्यवस्थेने कार्यक्रमाची गुणवत्ता अधिक वाढवली.
स्पर्धेतील विजेते:
प्रथम पुरस्कार (₹७५०००/-): ब्रह्मपुरा – एम. डी. कॉलेज
द्वितीय पुरस्कार (₹५००००/-): चिनाब से रावी तक – क्राऊड नाट्यसंस्था
तृतीय पुरस्कार (₹२५०००/-): कुक्कुर – ज्ञानसाधना कॉलेज
लक्षवेधी (₹१५०००/-): गुडबाय किस – जिराफ थिएटर्स
रायगड जिल्हा सर्वोत्तम: वेदना सातारकर हाजीर हो – सी. के. टी. कॉलेज, पनवेल
यंदा सुधागड तालुक्यातील जुन्या हौशी नाट्यसंस्थांचाही गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक अशोक समेळ, डॉ. मोने आणि रवींद्र घोडके यांनी रंगकर्मींना प्रोत्साहन देत निकाल जाहीर केला.
भविष्यासाठी आश्वासक पाऊल
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने तरुण कलाकारांना नवी दिशा मिळाली असून भविष्यातही अशीच सांस्कृतिक पर्वणी साजरी होण्याचा विश्वास प्रेक्षकांनी व्यक्त केला.