कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवात कराडच्या रसिकांना सांस्कृतिक पर्वणी लाभणार आहे. कृषी महोत्सवांतर्गत १७ ते २० जानेवारी दरम्यान कृष्णा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने नामांकित कलाकार उपस्थित राहणार आहेत.
कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १७ ते २० जानेवारी दरम्यान कृष्णा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (ता. १७) सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राची लोकधारा दाखविणारा ‘जय जय महाराष्ट्र माझा!’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भूपाळी ते भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा दाखविणारा हा कार्यक्रम आपल्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची नृत्य संगीतमय गाथा सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निर्मिती – दिग्दर्शन ई टीव्ही आरोही व झी टीव्ही ‘सारेगम’ अंतिम विजेता फेम महेश हिरेमठ यांनी केले आहे.
गुरवारी (ता. १८) सायंकाळी ५ वाजता ‘सूर बहार..’ ही सदाबहार हिंदी – मराठी गाण्यांची बहारदार मैफल आयोजित करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी ५ वाजता ‘स्वरसांगाती’ प्रस्तुत महाकवी ग. दि. माडगूळकर व महान संगीतकार – गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेला ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २०) दुपारी २ वाजता सौ. तेजस्विनी शहा यांचा खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ५ वाजता भारताची देदीप्यमान वाटचाल गायन व नृत्यातून उलगडून दाखविणारा हा ‘ये जो देस हे मेरा’ सांगितिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मिलिंद ओक दिग्दर्शित या कार्यक्रमात ‘झी मराठी सारेगमप’ फेम गायक – गायिका सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी या अनोख्या सांस्कृतिक पर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.