मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार क्रांतिवीर शाळेचा सन्मान.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
राज्य शासनाच्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांचा सन्मान राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात स्वच्छता मॉनिटर उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्या 64 हजार शाळांमधून राज्यातील सर्वोत्कृष्ट 100 शाळांची निवड केली असून यामध्ये म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ नायकवडी शाळेची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
विद्यार्थी मॉनिटरच्या माध्यमातून क्रांतिवीर शाळेने स्वच्छते बद्दल प्रबोधनात्मक उत्कृष्ट कार्य केले असून शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना विश्वंभर बाबर,यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे 31 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सन्मान होणार आहे.
यापूर्वीही राज्य शिक्षण विभागाच्या आंतरराष्ट्रीय शाळा उपक्रम निवड,तसेच वनश्री पुरस्कार प्राप्त शाळा म्हणून राज्यस्तरावर सन्मान झालेला आहे. स्वच्छता मॉनिटर सन्मान प्राप्त होत असल्याबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन व शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचे अभिनंदन केले.