पाटण आणि कराड तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना पाणलोट क्षेत्रात आज बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 90.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, उद्या स्वातंत्र्यदिन असल्याने यानिमित्त ओयना धरणावर आकर्षक लेझर शोमधून तिरंगा साकारण्यात आलेला आहे. सध्या छोट्या नद्या, ओढे, नाल्यांमधून प्रति सेकंद सरासरी फक्त 1 हजार 234 क्युसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात सुरू आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 14.58 टीएमसी पाण्याची गरज आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीसाठ्याने 90 टीएमसीचा टप्पा पार केला. त्यामुळे 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे कोयना धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
आज बुधवारी सकाळपर्यंत काेयनानगर येथे 01 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 03 आणि महाबळेश्वरला 01 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 86.15 टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी आहे. तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
विद्युत रोषणाईमुळे कोयना धरणाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. विद्युत रोषणाईच्या दृश्याची चित्रफित कोयना धरण व्यवस्थापनाने समाज माध्यमांवर प्रदर्शित केली आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत हा सुखद अनुभव घेत या उपक्रमाचे लोकांकडून कौतुकही होत आहे. या अभिनव उपक्रमामध्ये प्रामुख्याने कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार, उपअभियंता आशिष जाधव आदी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.