पत्रकारांच्या लढ्याला यश;अपघात प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल, अमरण उपोषण मागे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, दि.१ :
धुळदेव परिसरात झालेल्या निकम कुटुंबीयांच्या भीषण अपघात प्रकरणी स्थानिक पत्रकारांनी केलेल्या मागणीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला असून पत्रकारांच्या लढ्याला यश मिळाले आहे.

 

सातारा–पंढरपूर मार्गावरील धुळदेव परिसरात 27 मार्च 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कोडोली येथील निकम कुटुंबीयांची कार खड्ड्यात आपटून पलटी झाली होती. या अपघातात अशोक विष्णू निकम (वय 76) व कुमारी लक्ष्मी सचिन निकम (वय 13) यांचा मृत्यू झाला होता, तर इतर कुटुंबीय जखमी झाले होते. रस्त्याचे अपूर्ण काम, खोल खड्डे आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसणे हे या दुर्घटनेमागील मुख्य कारण असल्याचे समोर आले होते.

धुळदेव परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून या मार्गावरील म्हसवड-माण नदी पूल, दिवड-करंज ओढा पूल, धुळदेव ओढा पूल आदी कामे गेल्या आठ वर्षांपासून अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप  नागरिक व पत्रकाराकडून करण्यात आला होता .

या घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्रकारांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत म्हसवड पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. तसेच १ एप्रिल २०२६ रोजी अमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर सपोनि दत्तात्रय दराडे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तत्काळ तपास करून रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 105, 125 (अ)(ब), 324(4) अन्वये गुन्हा दाखल केला.

पत्रकारांच्या मागणीनुसार गुन्हा दाखल झाल्याने नियोजित अमरण उपोषण मागे घेण्यात आले असून या लढ्याला यश मिळाले आहे. स्थानिक पत्रकारांनी सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या तत्पर आणि जबाबदार कारवाईचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यात अशा निष्काळजीपणावर आळा बसावा आणि अपूर्ण रस्ते कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *