पत्रकार हा समाजाचा आरसा, पत्रकारावरील हल्ल्याविरोधात कडक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. मीनाक्षीताई पोळ भारतीय मजदूर सेवा संघ नवी दिल्ली तर्फे उंब्रज येथे पत्रकार दिन साजरा
“भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे. पत्रकार एक समाजाचा आरसा आहे. समाजामध्ये पत्रकाराची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, त्यामुळे पत्रकारांची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची आहे. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्या विरोधात कडक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन 6 जानेवारी जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधून मीनाक्षीताई पोळ (भारतीय मजदूर सेवा संघ पुणे मंडळ अध्यक्ष) यांनी केले. भारतीय मजदूर सेवा संघ यांच्यातर्फे उंब्रज ता. कराड येथे 6 जानेवारी जागतिक पत्रकार दिन साजरा केला गेला. यावेळी मसूर व उंब्रज विभागातील पत्रकारांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती दैनिक ऐक्य पत्रकार बाळासाहेब गुरव, दैनिक लोकमंथनचे दादासाहेब काशीद, आपला सातारा न्यूजचे रवींद्र वाकडे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज वन इंडियाचे पत्रकार कुलदीप मोहिते, दैनिक प्रभातचे रघुनाथ थोरात, मुक्तागिरीचे श्रीकांत जाधव, योगेश पोळ व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
मीनाक्षीताई पोळ ह्या कामगारांच्या मूलभूत सुविधा व समस्यांसाठी लढा देत असतात. त्यांनी अनेक कामगार उपयोगी योजना राबवल्या आहेत. कोणत्याही माणसाचे महत्त्व पद मिळाल्याने कधीच वाढत नसते, तर ते त्या पदाला किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम नेतृत्व दाखवतो. यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते. समाजातील असंघटित कामगारांना मूलभूत सोयी व सुविधा मिळवण्यासाठी गावोगावी जाऊन त्यांच्या हक्काचे मिळाले पाहिजे, यासाठी मीनाक्षीताई पोळ यांची धडपड चालू असते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी जपत मीनाक्षीताई पोळ यांनी उंब्रज आणि मसूर भागातील पत्रकारांना दिलेला सन्मान हा निश्चितच पत्रकारांसाठी एक शाबासकीची थाप आहे.