क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात पत्रकार दिन साजरा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड.. प्रतिनिधी
अध्यपत्रकार व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केलेला पत्रकार दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
पत्रकार दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर होते. यावेळी पत्रकार विजय टाकणे ,महेश कांबळे , एल के सरतापे, सचिन मंगरुळे, विठ्ठल काटकर, नागनाथ डोंबे, अहमद मुल्ला,, सचिन सरतापे, शंकर पानसांडे,, शहाजी लोखंडे ,सचिन मेनकुदळे इत्यादी पत्रकारांचा सन्मान संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर ,यांची हस्ते करण्यात आला. यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले पत्रकार हा समाजाचा आरसा असून चांगल्या सामाजिक जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असतो . अभ्यासूवृत्ती, निर्भीड व परखडपणा जोपासून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून, प्रशासनावर सुयोग्य अंकुश ठेवून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेचे व्रत जोपासण्याचे आवाहन प्राध्यापक बाबर यांनी केले. पत्रकारितेच्या माध्यमातून बरं लिहिण्यापेक्षा खरं लिहिण्याबाबत सुचित करून सामान्य माणसाच्या हितासाठी माण तालुक्यातील पत्रकारांनी आजवर केलेल्या कार्याचा गौरव प्रा. बाबर यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे यांनी विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. बाळशास्त्री जांभेकर तसेच पत्रकार दिनाचे महत्त्व, याबरोबरच पत्रकारिता काल आज उद्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारिता क्षेत्राला प्रचंड वाव असून उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात येण्याचे आवाहन महेश कांबळे यांनी केले. प्रास्ताविक सुलोचना बाबर यांनी करून क्रांतिवीर संकुल एका पत्रकारानेच उभे केल्याचे अभिमानाने सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार समन्वयक अभिजीत सावंत यांनी व्यक्त केले.

