जिशान जावेद मुल्ला याची जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे निवड :देविदास कुलाळ यांचे हस्ते सत्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाल्याबद्दल चि.जिशान जावेद मुल्ला याचा सत्कार राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक देविदास कुलाळ साहेब यांचे हस्ते करण्यात आला. केंद्र समूह म्हसवड नं.2 ची शिक्षण परिषद जि प शाळा आसाळवाडा येथे आयोजित करण्यात आली होती त्यास भेट देण्यासाठी देविदास कुलाळ या ठिकाणी आले होते. त्यांच्यासमवेत माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी नवोदय विद्यालय येथे प्रवेशास पात्र होतो ही नक्कीच अभिमानाची बाब आहे असे गौरवोदगार कुलाळ साहेब यांनी काढले. ते पुढे असे म्हणाले की अजूनही आपल्या ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढवण्यावर सर्व शिक्षकांनी भर द्यावा लागेल.
चि. जिशान याने जिल्हा परिषद शाळेत राहून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत कोठेही कमी नाहीत हे दाखवून दिले असल्याचे मत माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी मांडले. जिल्हा परिषद शाळांनी आपल्या शाळेचा पट वाढवण्याबरोबर गुणवत्तेत ही वाढ करणे काळाची गरज बनली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जिशानला इयत्ता पहिली ते चौथीला मार्गदर्शन करणाऱ्या सौ मुल्ला मॅडम व सौ.चोपडे मॅडम तसेच वर्ग शिक्षक जावेद मुल्ला सर यांचेही कौतुक करण्यात आले. याप्रसंगी श्री.कुलाळ यांचा सत्कार धुळदेव चे मुख्याध्यापक पतंगे सर तर श्री. लक्ष्मण पिसे यांचा सत्कार शरद शिर्के सर यांनी केला. शिक्षण परिषदेचे नियोजन केंद्रसंचालक रमेश कापसे सर यांच्या नियोजना खाली करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्र समूह म्हसवड नं.2 मधील सर्व प्राथमिक शाळांचे व माध्यमिक शाळांचे शिक्षक वृंद उपस्थित होते.