सातारा व कराड उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरकारभाराची चौकशी करा – माजी सैनिक प्रशांत कदम यांची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
सातारा, (उब्रज) (प्रतिनिधी):
सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग व कराड उत्तर उपविभागातील इंजिनिअर अधिकाऱ्यांच्या कथित गैरप्रकारांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि कृती समितीचे अध्यक्ष माजी सैनिक श्री. प्रशांत कदम यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता श्री. अ.भी. चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात श्री. कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिम सातारा येथील कार्यकारी अभियंता श्री. राहुल अहिरे, उपविभागीय अभियंता श्री. राजेश धुमाळ, कनिष्ठ अभियंता श्री. प्रवीण कोकरे आणि शाखा अभियंता श्री. आर.एस. टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हे अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असून, बदलीच्या आदेशानंतरही प्रत्यक्षात त्या जागीच कार्यरत राहिले आहेत.
श्री. आर. एस. टोपे यांची २०१७ पासून कराड उत्तर विभागात सलग नियुक्ती असून, बदली आदेश असूनही त्यांनी प्रत्यक्षात तेथेच काम सुरू ठेवले आहे. तसेच श्री. कोकरे यांना एक वर्षाची वाढीव मुदत कोणाच्या शिफारशीनुसार देण्यात आली याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
काम न पाहता बिलिंग, निकृष्ट दर्जाचे काम आणि नियमबाह्य टेंडर प्रक्रिया
कराड उत्तरमधील उंब्रज-इंदोली-वडगाव पाल रस्त्याच्या देखभालीसाठी निधी दिला असूनही, काम न करता बिल उचलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच आशियाई विकास बँकेच्या निधीतून मंजूर झालेल्या शामगाव घाट ते मायणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असून, ठेकेदारास नियोजित रकमेपेक्षा दुप्पट निधी दिला गेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचा आरोपही श्री. कदम यांनी केला आहे.
तिरंगा हातात घेऊन आंदोलनाचा इशारा
या सर्व प्रकारांची माहिती अधिकार कायद्यानुसार मागवण्यात आली असून, जर तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही, तर “तिरंगा हातात घेऊन आंदोलन करावे लागेल”, असा इशाराही श्री. प्रशांत कदम यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई आणि अधीक्षक अभियंता श्री. संतोष रोकडे यांना सुद्धा निवेदन दिले आहे.
—
अधिक माहितीकरिता संपर्क:
प्रशांत कदम
अध्यक्ष, कृती समिती
सैनिक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य
–