शौर्य दिन साजरा करताना माजी सैनिकांचा अपमान — सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या बडतर्फीची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी
२०१६ मधील भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेचा प्रतीक असलेला २९ सप्टेंबर — शौर्य दिन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमात माजी सैनिक, अपंग सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि संरक्षण समिती सदस्य यांना न बोलावल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे संचालक कर्नल दीपक ठोंगे (नि.) यांना निवेदन देऊन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. प्रवीण बर्गे यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे.
शौर्य दिन हा भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करून शत्रुला दिलेल्या प्रत्युत्तराची गौरवगाथा साजरी करण्याचा दिवस आहे. या दिवशी देशभरातील सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये माजी सैनिकांचा सन्मान केला जातो. परंतु, सातारा कार्यालयात याउलट फक्त निवडक व्यक्तींनाच निमंत्रण देत कार्यक्रम पार पडला. शौर्य दिनाऐवजी मिलिटरी बॉईज हॉस्टेलचा पालक मेळावा घेण्यात आल्याने सैनिक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमाबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की निर्णय श्री. प्रवीण बर्गे यांनी एकहाती घेतले. बर्गे हे सहायक अधिकारी असून पूर्ण वेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नसतानाही त्यांनीच सर्व निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा हा जिल्हा माजी सैनिक, शहीद कुटुंबे आणि सैनिक परंपरेसाठी प्रसिद्ध असून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर माजी सैनिकांची संख्या आहे. तरीसुद्धा, माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री ना. शंभूराज देसाई यांनाही निमंत्रण न देणे हा सैनिकांचा व कुटुंबीयांचा घोर अपमान असल्याचे प्रशांत कदम यांनी नमूद केले आहे.
कदम यांनी दिलेल्या निवेदनात
प्रवीण बर्गे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फी करावी,
आठ दिवसांत लेखी अहवाल सादर करावा,
व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक संघटनांची विशेष बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे.
यापैकी मागण्या मान्य न झाल्यास १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सैनिक हक्क मोर्चा जिल्हा सैनिक कार्यालयावर काढला जाणार असल्याची सूचना निवेदनात देण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री, पालक मंत्री सातारा व जिल्हाधिकारी सातारा यांनाही पाठविण्यात आले आहे.
–

