पाटण मतदार संघातील विविध विकास प्रकल्पांसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. आचारसंहितेच्या लागू होण्यापूर्वी या मंजूर कामांची निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करून कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पाटण विधानसभा मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना सांगितले की, मतदार संघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. मंजूर कामांची निविदा तात्काळ काढून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलावीत. पर्यटन विकासासह डोंगरी विकास निधी आणि कोयना भूकंप पुनर्वसन निधीतील कामांनाही तांत्रिक मान्यता देऊन तत्काळ सुरुवात करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.
विघुत वितरण कंपनीला जिल्हा नियोजन आणि डोंगरी विकास निधीतून मदत मिळाली असून, त्याअंतर्गत लाईट पोल्स, डीपी, आणि विद्युत तारा बदलण्याची कामे जलदगतीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. लघु पाटबंधारे विभागालाही त्यांच्या प्रलंबित कामांची पूर्तता करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करावे, असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित रस्त्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण करून ते तातडीने शासनाकडे सादर करावे, अशी सूचना पालकमंत्री देसाई यांनी केली. पाणंद रस्त्यांच्या २०१ कार्य आदेशांची अंमलबजावणी त्वरित करावी, तसेच निकावणे बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.