“म्हसवडमध्ये विकासाच्या नावाखाली मूलभूत सुविधांचा बळी!”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी
म्हसवड शहरातील पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाइपलाईन टाकण्याच्या कामामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठेकेदाराकडून अर्धवट व निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. याविरोधात शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रशासनाला जाब विचारला असून, जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली शहरातील अनेक भागांत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने चारी काढल्यानंतर, रस्त्याच्या डागडुजीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. खोदलेले रस्ते मुरम व मातीच्या ढिगाऱ्यांनी भरलेले असून, निळ्या कनेक्शन पाईप्स विस्कळीत अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या आहेत. परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
“काम सुरू ठेवायचं, पण लोकांच्या सुरक्षिततेचा विचार नको? हा कोणता विकास?”, असा संतप्त सवाल प्रा. बाबर यांनी केला.
शहरातील चांदणी चौक, शिक्षक कॉलनी, पोलीस स्टेशन परिसर, तसेच मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. “रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे काम कोणत्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली सुरू आहे, याचे उत्तर प्रशासन देण्यास तयार नाही. मुख्याधिकारी व संबंधित बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप आहेत.
याचबरोबर, पाण्याचा पुरवठाही अनियमित असल्याने नागरिक त्रस्त आहेत. “दुथडी वाहणारी माणगंगा उशाला आणि घशाला कोरडं!” अशा शब्दांत नागरिक आपली व्यथा मांडत आहेत. शेंबडे वस्ती पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी फिल्टरविना मिळत असल्याचेही प्रा. बाबर यांनी निदर्शनास आणून दिले. वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे पाणी वेळेवर पोहोचत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या चार वर्षांपासून नगरसेवक नसल्याने प्रशासनाचा एकतर्फी कारभार सुरू असून, सामान्य नागरिकांचा आवाज दाबला जात आहे. “शहरातील मूलभूत सुविधा धुळीत मिळवत असतानाही कोणीच जबाबदारी घेण्यास तयार नाही,” अशी खंत प्रा. बाबर यांनी व्यक्त केली.
“जर वेळीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर उद्रेक अटळ आहे,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला.