उद्योग, व्यवसाय वाढीतील स्थानिक अडथळे जिल्हास्तरावर दूर करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर –
जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योजक, व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमधील धोरणात्मक बाबीसंबंधी शासनस्तरावर पाठपुरावा करू. स्थानिक अडथळे जिल्हास्तरावर दूर करावेत. स्थानिक समस्या जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांच्या सहकार्याने मार्गी लावाव्यात, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
सोलापूर जिल्ह्याचा सर्वंकष विकास करण्याची ग्वाही दिल्यानंतर, त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांची बैठक व चर्चासत्र घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी, उद्योजक नितीन बिज्जरगी, चिंचोळी एमआयडीसीचे अध्यक्ष राम रेड्डी, उद्योजक अभिजीत टाकळीकर, जयेश पटेल आदिंसह शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, डॉक्ट़र, सी. ए., वकील आदी उपस्थित होते.
उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील एक एक प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुशल कामगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी तसेच, अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच, चिंचोळी एमआयडीसीमध्ये उपलब्ध इमारतीमध्ये आयटी हब करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा. आवश्यक कार्यवाही करू, असे त्यांनी आश्वस्त केले.
क्रीडाईचे अध्यक्ष श्री. जिद्दीमणी यांनी सोलापूर शहरामध्ये जर एखादी मिळकत भाडेतत्त्वावर द्यायची असल्यास 64 टक्केपर्यंत रेंट टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स कमी होणे गरज व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी तुलनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन, त्यानंतर आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने प्रयत्न करून सोलापूरात स्मार्टसिटीच्या माध्यमातून प्रदर्शन केंद्राची उभारणी केल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सदर प्रदर्शन केंद्रामुळे वेगवेगळे प्रदर्शन भरवणे व मार्केटिंग करणे सोईचे होईल. त्यामुळे रोजगार वाढण्याची संधी मिळेल. या केंद्राला आवश्यक सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक राजु राठी यांनी केले. आभार नितीन बिज्जरगी यांनी मानले.