शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आज शनिवारी दि.२ मार्च २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कुल म्हसळाचे प्रांगणात‘शासन आपल्या दारी’ तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली.शासन आपल्या दारी या अभियनांतर्गत म्हसळा तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे यामध्ये विशेषत: नवीन आधार कार्ड काढणे,आधारकार्डामध्ये दुरुस्ती करणे,नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती तसेच शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे,खराब झालेली शिधापत्रिका बदलणे,संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना,वृद्धापकाळ,विधवा,दिव्यांग,राष्ट्रीय निवृत्ती सेवा योजना,नवीन वीज कनेक्शन अर्ज स्विकृती, वीजबिल दुरुस्ती,नवीन मतदार नोंदणी,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,जात प्रमाणपत्र,जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी योजनांचा समावेश होणार आहे.
अभियानात सहभागी होऊन नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे.