लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवडच्या सिध्दनाथ – जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दिलीपराज कीर्तने (प्रतिनिधी )
म्हसवड :
                लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत म्हसवडच्या श्री सिध्दनाथ – जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री १२ वाजता धार्मिक विधीपूर्वक ,पारंपारिक पध्दतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. 
         तब्बल महिनाभर चालणाऱ्या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना,नवरात्रारंभ व श्रींच्याहळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी,सालकारी महेश गुरव यांच्या हस्ते आरती करुन मानकरी,सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे १२ दिवसाचे घट उठविण्यात आले. घट उठविल्यानंतर १२ दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले.
          या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते,अशी अख्यायिका असल्याने व
                             (  सुशोभित हत्तीवरील सजवलेल्या अंबारीत बसविलेली श्रींची मूर्ती,अर्थात विवाहाला जाण्यासाठी सज्ज झालेला ” वर )
             मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे.या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली.   संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी “वर” सज्ज झाला.
नारळाची तोरणे,फुलांच्या माळा,ऊसाच्या मोळ्या,भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विध्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील मोकळ्या मैदानात पंचक्रोशीतील ,खेड्यापाड्यातील भाविकांचा गजी- ढोलाचा कार्यक्रम अखंड सुरु होता.
                                ( श्रीं सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या विवाहासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भाविक भक्तांची प्रचंड गर्दी)
                       श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आले .रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गभाऱ्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत होते आणि सालकऱ्यांसह श्रींची मूर्ती आतील गाभाऱ्यात विवाहाप्रित्यर्थ नेण्यासाठी पुजारी मंडळी पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत होते.ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरु होती. शेवटी मोठी रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली. त्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपारिक पध्दतीने,विधीपूर्वक,पिंटू पाठक,प्रज्योत पाठक आदी पुरोहितांमार्फत मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री १२वाजता सनई-चौघडा,ढोल-ताशा,बँड,गजी झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत,मोठ्या थाटात संपन्न झाला.    पारंपारिक रिवाजानुसार श्रींच्या विवाहसोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह संपन्न झाला.
         दरम्यान,यावेळी येथील , ए. पी. आय. राजकुमार भुजबळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश गुरव,उपाध्यक्ष वैभव गुरव,सर्व विश्वस्त,रविकिरण गुरव,सागर गुरव,मार्तंड गुरव,बजरंग गुरव,अजित गुरव,हरिभाऊ गुरव,महेश गुरव,सचिव दिलीप कीर्तने, ( गुरव )  श्रींचे मानकरी,सेवेकरी,नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी,मानाच्या करवल्या,गावातील प्रतिष्ठीत नागरिक,पुरोहित,पुजारी मंडळी आणि हजारोंच्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिलेल्या भाविकांच्या श्रींच्या नावाच्या व चांगभलेच्या जयघोषांनी मंदीर परिसर दुमदूमून गेला.
माने परिवाराकडुन श्रींच्या शाही विवाहाचा पोषाख –
श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या लग्नासाठी येथील माने परिवाराकडुन पोषाख देण्याची परंपरा आहे, त्यानुसार येथील इंजि. बाळासाहेब माने व प्रा. राजेंद्र माने यांनी श्रींचा पोषाख रिवाजानुसार सवाद्य मंदिरात आणला
          श्रींच्या विवाहानंतरची “वरात”म्हणजे श्रींची “रथयात्रा”….ही रथयात्रा बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी  असून या दिवशी तब्बल एक महिना चालणाऱ्या श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे.  या रथयात्रेसाठी दरवर्षी ६ ते ७ लाख भाविक आवर्जून उपस्थित असतात.
            श्रींचा विवाह मंदिराच्या गाभाऱ्यात संपन्न होतो त्यामुळे बाहेरील भाविकांना तो पाहता येत नाही,ही अडचण ओळखून  देवस्थान ट्रस्टने हत्ती मंडपाच्या पाठीमागे मोठ्या पडद्यावर हा सोहळा सर्वांना पाहता येईल अशी सोय करण्यात आली होती.शिवाय ज्या भाविकांना या सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही त्या भाविकांना घरी बसून हा सोहळा पाहता येईल यासाठी ऑनलाईन ,लाईव्ह पाहण्याची सोय देखील करण्यात आली होती  तमाम भाविकांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!