सातारा जिल्ह्यातील भीषण अपघातप्रकरणी आरोपीस शिक्षा – दहिवडी न्यायालयाचा निर्णय

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
दहिवडी (ता. माण) :
सातारा – पंढरपूर रस्त्यावर मौजे गोंदवले खुर्द येथे १७ मे २०२२ रोजी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी दहिवडी न्यायालयाने आरोपी महेंद्र ज्ञानेश्वर वाघमारे (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) यास दोषी ठरवत विविध कलमांखाली सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या अपघातात उमाजी आप्पा नरळे व अजित शंकर नरळे (रा. पाणवण, ता. माण, जि. सातारा) हे दोघे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले होते. अपघाताच्या वेळी हे दोघे पल्सर मोटारसायकल (MH-11-CK-5313) वरून पुण्याहून पाणवण येथे जात असताना, समोरून भरधाव वेगात आलेल्या स्वीप्ट गाडी (MH-14-GH-4458) ने त्यांना जोरदार धडक दिली होती.

सदर प्रकरणी आप्पा दिगंबर नरळे (वय ५०, रा. पाणवण) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा क्रमांक 118/2022 नुसार आरोपीविरुद्ध भादंवि कलम 304-अ, 279, 337, 338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास महिला पो.हवा. डी.ए. डोईफोडे (ब.नं. 2169) यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून आणि कागदपत्रांची तपासणी करून पूर्ण केला. प्रकरणी दहिवडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. श्री. राजपूत यांनी कामकाज पाहिले.

आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस.एस. गाडवे यांनी खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली :

कलम 279 भादंवि – तीन महिने सश्रम कारावास व ₹1,000/- दंड

कलम 304-अ भादंवि – दोन वर्षे सश्रम कारावास व ₹40,000/- दंड

कलम 338 भादंवि – सहा महिने सश्रम कारावास व ₹1,000/- दंड

मोटार वाहन कायदा कलम 184 – दोन महिने सश्रम कारावास

या खटल्यात उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अश्विनी शेंडगे, स.पो.नि. डी.पी. दराडे, तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पो.कॉ. विलास हांगे (2473) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या निकालामुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांना काही प्रमाणात न्याय मिळाला असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याने दिलेला इशारा ठरला आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!