व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमानुसार तीन वर्षां पेक्षा जास्त एकाच ठिकाणी कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्याची बदली होणे बंधनकारक आहे.शिवाय निवडणूक प्रकियेवर प्रभाव पडू नये म्हणून अधिकारी होम डिस्ट्रिक्ट आणि त्याच निवडणूक मतदारसंघातला असू नये या संविधानिक तत्वानुसार म्हसवड नगरपरिषद मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी प्रा.कविता म्हेत्रे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सातारा यांचेकडे केली. म्हसवड नगरपरिषद ,’क’ वर्ग नगरपरिषद आहे. नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी दि.8 जुलै 2020 रोजी म्हसवड नगरपालिकेत वर्ग -2 चे अधिकारी म्हणून हजर झाले होते.त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाल दि.7 जुलै 2020 रोजी पुर्ण झाला आहे.त्याच दरम्यान त्यांची बदली वर्ग-1 चे अधिकारी म्हणून उपायुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका येथे झाली.ते तिथे हजर होऊन वर्ग -1 च्या पदाचा दोन महिने पगार त्यांनी घेतला. त्या दरम्यान म्हसवड नगरपालिकेत कुणाची ही नियुक्ती होऊ दिली नाही.हे संशयास्पद आहे.त्यांनतर लगेच दोन महिन्यांत दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी परत ते वर्ग -1 च्या पदावरून वर्ग-2 च्या पदावर म्हसवड नगरपरिषद ह्या पदावर बदली करून आले.महाराष्ट्रात बढती झालेले वर्ग-1 पदावर काम करणारे अधिकारी जाणीवपूर्वक वर्ग -2 च्या पदावर बदली करून पूर्वीच्या ठिकाणी येतात हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण आहे. जो अधिकारी वर्ग-1 पदावरुन वर्ग-2 च्या पदावर काम करण्यासाठी येतो किंवा आणला जातो.तो अधिकारी निवडणूक प्रक्रियेत निःपक्षपणे व तटस्थ भूमिका घेऊ शकत नाही.शिवाय सदरच्या मुख्याधिकारी यांचे सातारा होम डिस्ट्रिक्ट आहे. त्यांचे गाव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात येत आहे. यामुळे म्हसवड नगरपरिषद मुख्याधिकारी यांचा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडून संविधानाचे तत्व बाधित होत आहे व आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे. लोकसभा विधानसभा नगरपरिषद निवडणुका निःपक्षपातीपणे होण्यासाठी म्हसवड मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी. केंद्रीय मुख्य निवडणूक अधिकारी दिल्ली,राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, मा.प्रधान सचिव नगरविकास विभाग 2,मंत्रालय मुंबई,विभागीय आयुक्त पुणे,नगरपरिषद प्रशासन संचालक, कोकण भवन, मुंबई इ.संबंधित कार्यालयाला सदर अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली आहे.