आधुनिक काळात मुद्रितशोधकाचे महत्व अनन्यसाधारण आहे’: देवदास मुळे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते (प्रतिनिधी )
कराड:
आजच्या यांत्रिकयुगामध्ये आपण विविध आधुनिक माध्यमे तसेच पारंपारिक माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ऑनलाइन फोरम या आधुनिक माध्यमासोबतच वर्तमानपत्र, आकाशवाणी, टेलिव्हिजन या प्रसारमाध्यमांचा आज मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परंतु एक खेदाची बाब आहे की, या माध्यमांमध्ये वापरली जाणारी मराठी भाषा या भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्याकरणदृष्ट्या व अशुद्ध लेखन चुका दिसून येतात. अशा चुकांच्यामुळे वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होतो. आपल्याला लेखनातून जो गर्भित अर्थ वाचकापर्यंत पोहोचवायचा असतो त्याला मोठ्या प्रमाणावर बाधा पोहोचते.
आज-काल समाजामध्ये वापरणारे विविध फ्लेक्स बोर्ड, दुकानावरील पाट्या, टीव्हीवरील स्क्रोलिंग मध्ये चालणाऱ्या बातम्या, वर्तमानपत्रे यामध्ये मोठ्या प्रमाणावर शब्दांमध्ये अशुद्धता दिसून येते. तसेच व्हाट्सअप, इंस्टाग्राम , फेसबुकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात शुद्धलेखनाची अशुद्धता दिसून येते. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या मराठी भाषेतील गोडवा मराठी भाषेमधील शब्दांमध्ये लपलेला गर्भित अर्थ वाचकापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी आपणाला आपले लेखन पडताळून पाहिले पाहिजे. त्याचे मुद्रितशोधन होणे गरजेचे आहे या उद्देशाने महाविद्यालयामध्ये ‘मुद्रितशोधन आणि भाषा संपादन’कोर्सचे आयोजन केले आहे. असे प्रतिपादन मा देवदास मुळे यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मराठी विभागांतर्गत ‘मुद्रितशोधन आणि भाषा संपादन’ या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
“आजच्या विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. तो विविध माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करतो. आपल्या मनातील भाव-भावना विचार माध्यमांमधून व्यक्त करतो, परंतु माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी शब्दांची चपखलपणे बांधणी करण्यासाठी त्याला शुद्धलेखन व मुद्रितशोधन गरजेचे आहे. विद्यार्थ्याने या कोर्सचा फायदा घ्यावा व आपले लेखन सुधारावे” असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले.
“विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच या विविध कोर्सला प्रवेश घेऊन विविध कौशल्य प्राप्त करावेत” असे मनोगत जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सरोदे मॅडम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकव स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. प्रदीप चोपडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. वसिम आंबेकरी यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राधिका कुलकर्णी, सौ.लक्ष्मी पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.