व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी :प्रतिनिधी शिंगणापूर पोलीस चौकी आणि नातेपुते पोलीस स्टेशनच्या सहकार्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांनी एका गंभीर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले. रामदास दत्ता वाघमारे, जो नातेपुते घाटात झालेल्या मोटरसायकल अपघातात संबंधित होता, त्याने घटनास्थळावरून पळून जाऊन जालना येथे पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
घटनेची माहिती मिळताच, दहिवडी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. दहिवडी एसटी स्टँडवरुन जालन्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. यानंतर आरोपीला नातेपुते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या धाडसी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलीस हवालदार नंदकुमार खाडे, पोलीस नाईक नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, संतोष विरकर, आणि विलास हांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दहिवडी पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपीला न्यायाच्या कचाट्यात आणले गेले असून, या पोलीस टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.