भारताची इहा केदार कुलकर्णी ही मल्लखांब प्रशिक्षण व स्पर्धेसाठी अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.जर्मनीमध्ये उद्या बुधवार पासून कार्निवल ऑफ कल्चर्स परेड व स्पर्धा होणार आहे.या मराठमोळ्या मल्लखांब खेळ प्रकारातील निवडीने अमेरिकास्थित परंतु मूळच्या गोंदवले बुद्रुक येथील इहाने साताऱ्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवलाय. नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झालेले केदार विजयकुमार कुलकर्णी यांचं मूळ गाव माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक.त्यांचं बालपण आणि शिक्षण देखील गोंदवल्यातच झालंय.त्यामुळे गावाची संस्कृती त्यांनी परदेशातही जपलीय.केदार यांचे वडील डॉ विजयकुमार हेही क्रीडाप्रेमी.मर्दानी खेळात रस असल्याने त्यांनी कुस्ती व मल्लखांब या खेळांना नेहमीच प्रोत्साहन दिलं.आपल्या आजोबांचा हा वारसा जपून अवघ्या दहा वर्षाच्या इहाने मराठमोळ्या मल्लखांबमध्ये अमेरिकेत नाव गाजवलंय.
अमेरिकेतील कनेटिकट राज्यात २०२१ मध्ये सुरू झालेल्या मल्लखांब प्रशिक्षण केंद्रात उपेंद्र वाटवे, अरुण मराठे,जयेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती गेल्या दोन वर्षांपासून सराव करतेय.अगदी थोड्याच कालावधीत इहाने मल्लखांब प्रकारात आपला वेगळा ठसा उमटवलाय.यात तिने यशस्वी होत अनेक पुरस्कारही पटकवलेत.तिच्या या प्राविण्याची दखल आता आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.जर्मनीतील (बर्लिन) रमणबाग युवा मंच या संस्थेने भारत,नेपाळ,अमेरिका,जपान व जर्मनी या पाच देशांना 19 मे रोजी होणाऱ्या कार्निवल ऑफ कल्चर्स परेड व स्पर्धेमध्ये मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिलेय.१५ मे पासून २२मे पर्यंत हे प्रशिक्षण व स्पर्धा होणार आहे. यासाठी अमेरिकेतून इहा कुलकर्णीची निवड झालीय. ती अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार असली तरी मूळची भारतीय असल्याने तिचे कौतुक होत आहे. केदार व मृणाल हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक असले तरी त्यांनी गोंदवल्याची नाळ कायम ठेवले आहे.गावी वडील,भाऊ,वहिनी व नातेवाईक असल्याने सुट्टीच्या निमित्ताने ते कुटुंबासह नेहमीच गावी येतात.इहाने मर्दानी मल्लखांब खेळात दाखवलेल्या प्राविण्याबाबत कुलकर्णी कुटुंबियांसह गोंदवलेकरांचा ऊर अभिमानाने भरून आलाय.या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने याही स्पर्धेत इहा अव्वलस्थानी राहील यात शंकाच नाही.
—————