“जनतेच्या सेवेतच आयुष्य अर्पण करणार” – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी
माण तालुक्याचा सर्वांगीण विकास, दुष्काळ निर्मूलन आणि समाजहिताच्या कार्यासाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार व्यक्त करत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जपण्याची ग्वाही दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
मंत्री गोरे म्हणाले, “जनतेच्या अखंड विश्वासामुळेच मला मंत्रीपदाचा मान मिळाला आहे. अहिल्यादेवींच्या प्रेरणेने विकासाच्या कामांना अधिक गती देत राहणार आहे. समाजहितासाठी केलेले प्रत्येक पाऊल हे माझ्या जनतेला समर्पित आहे. विरोधक टीका करत राहतात; पण महान नेत्यांच्या विचारांचे आचरण मात्र त्यांच्याकडून होत नाही.”

यावेळी त्यांनी पुतळा उभारणीचा संपूर्ण खर्च स्वतः उचलण्याची घोषणा केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, संगर समाज सभागृहासाठी कोटी रुपयांचे अनुदान, म्हसवड शहरातील विविध विकासकामे आणि आधुनिक एमआयडीसी प्रकल्प या महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणाही त्यांनी केली.

तालुक्याच्या बदलत्या वाटचालीचा उल्लेख करताना गोरे म्हणाले, “माण तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या प्रयत्नांमुळे तालुक्याचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. पुढील निवडणुका पाण्याच्या मुद्यावर लढवाव्या लागणार नाहीत, ही माझी प्रतिज्ञा होती आणि आज तालुक्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला आहे.”

जनतेच्या प्रेमामुळेच सलग तीन वेळा आमदारकी आणि मंत्रीपद मिळाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, “हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. मात्र शेतकरी व मेंढपाळांना सक्षम करणे, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हेच माझे ध्येय राहील.”
या कार्यक्रमात डॉ. वसंत मासाळ यांनी गोरे यांना “माण तालुक्याचे खरे विठोबा” असे संबोधत धनगर समाजासाठी आधुनिक समाजमंदिराची मागणी केली. डॉ. प्रमोद गावडे यांनी पंढरपूर यात्रेचे प्रभावी नियोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत “वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आणि जनतेच्या प्रेमामुळेच विकासाची नवी दारे उघडली आहेत” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मासाळ यांनी केले तर आभारप्रदर्शनही त्यांच्या हस्तेच संपन्न झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, शिवाजीराव शिंदे, डॉ. प्रमोद गावडे, इंजिनिअर सुनील पोरे, सुरेश म्हेत्रे, तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, माण खटाव लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे मा. नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, युवा नेते लुणेश वीरकर, सामाजिक कार्यकर्ते विजय बनगर, मा. नगरसेवक आप्पासाहेब विरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे, युवा कार्यकर्ते विशाल विरकर, लक्ष्मण विरकर (करले), कृष्णदेव मदने, पोपट मासाळ, डॉ प्रमोद गावडे, दादासाहेब दोरगे, नारायण मासाळ, रामभाऊ कोडलकर, नानासाहेब दोलताडे, सचिन विरकर, यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते
👉 या सोहळ्यामुळे माण तालुक्यातील विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास जनतेत व्यक्त होत आहे.

