मी कोणाकडे तिकीटाची भीक मागणारा नाही तर मी तिकीट देणारा नेता आहे,:आ. महादेव जानकर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
राज्यातील भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षाची नियत चांगली नाही त्यामुळे मी कोणत्याच पक्षावर अवलंबुन नाही मी माझा स्वत:चा पक्ष राज्यासह देशात वाढवण्यासाठी फिरत आहे, मी लोकसभेच्या 48 जागा नव्हे तर सर्वच्या सर्व 543 जागा लढवणार असुन त्यासाठी संपूर्ण देशातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, गुजरात अन् महाराष्ट्रात मी झंझावात सुरु केला असुन मी कोणाकडे तिकीटाची भीक मागणारा नाही तर मी तिकीट देणारा नेता आहे, मी एक दिवस या देशाचा पंतप्रधान नक्की होणार आहे असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी म्हसवड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, आप्पासाहेब पुकळे, बबनदादा विटकर, अँड विलास चव्हाण इजि.दादासाहेब दोरगे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले की आमचा पक्ष छोटा आहे परंतु दुसऱ्याच्या जीवावर किती दिवस राजकारण करणार आमचा पक्ष वाढवावा लागेल असे कार्यकर्त्यांना सांगून सर्वसामान्य जनतेच्या सहयोगाने मी राज्यात व देशात पक्षवाढीचे काम करीत असुन या कामाला चांगले यश मला मिळत आहे, राष्ट्रीय समाज पक्ष हा आज 4 राज्यात कार्यरत असुन संपूर्ण देशभरात या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आगामी लोकसभा निवडणुक मी स्वतः लढवणार असुन त्यासाठी माढा, बारामती, परभणी आदीपैकी एक ठिकाणी माझी उमेदवारी निश्चित असणार आहे, तर गुजरात मधूनही मी लोकसभेसाठी उभा राहणार आहे त्यासाठी मिर्जापुर मतदार संघात माझी मोर्चेबांधणी झालेली आहे, सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून याबाबत मी निर्णय घेणार आहे, तर राज्यातील राजकारण हे अतिशय अस्थिर बनले असल्याचेही जानकर यांनी सांगितले. राज्यातील सत्तेत सर्वच विरोधी पक्ष जात असल्याने घटक पक्षांना आता सत्तेत स्थान मिळणार का ? या प्रश्नावर बोलताना आ. जानकर म्हणाले की सत्तेत वाटा मागताना आपले नगरसेवक किती, जि.प.सदस्य किती आमदार किती, खासदार किती हे तपासणे महत्वाचे आहे, त्यासाठीच मी पक्षाची ताकत वाढवण्याचे काम करीत असुन अगोदर या पक्षाचे नगरसेवक, आमदार, खासदार जास्तीत जास्त कसे निवडुन येतील यासाठी प्रयत्न करणार आहे, यासाठी सर्वसामान्य जनता मला मोलाचे सहकार्य करीत आहे. मी कोणत्याही पक्षावर अवलंबुन नसुन सर्वसामान्य जनतेच्या सहयोगावर अन् त्यांच्या शक्तीवर माझा पक्ष वाढवत आहे. त्यासाठीच मी राज्यभर कार्यकर्त्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत, आज माढा लोकसभा मतदार संघ पंजुन काढणार आहे.
आ. जानकर यांनी माढा लोकसभा मतदार संघात शेकडो वाहनांची रँली काढत कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी सुरु केल्या – असुन त्यांचा हा झंझावात पाहुन सर्वसामान्य जनता त्यांनाच आता आपले दैवत मानु लागल्याचे चित्र आहे. म्हसवड शहरात त्यांच्या शेकडो वाहनांचा ताफा आला असता माजी नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतीषबाजीत जोरदार स्वागत केले यावेळी बबनदादा वीरकर, इजि.दादासाहेब दोरगे आप्पासाहेब पुकळे यांनीही आ. जानकर यांचे म्हसवड नगरीत स्वागत करीत आ. जानकर यांचा जयघोष केला.