माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना ग्रामीण भागातील जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून ओळख असलेल्या प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाला माण-खटाव मतदारसंघातील नागरिकांनी मोठे पाठबळ दिले आहे, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या आणि महिलांच्या प्रेरणा आयकॉन प्रिती घार्गे यांनी व्यक्त केली.
म्हसवड येथे प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ आलेल्या प्रिती घार्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जनतेच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “घार्गे साहेबांना माण-खटावची जनता चांगली ओळखते. त्यांनी राजकारणात कधीही कोणाचा द्वेष केला नाही, उलट सर्वांना मदतच केली आहे. राजकारणापेक्षा समाजकारण हे घार्गे साहेबांच्या रक्तात आहे. म्हणूनच त्यांनी खटावसारख्या दुर्गम आणि दुष्काळी तालुक्यात कारखानदारी उभी करून तेथील बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे.”
प्रिती घार्गे यांनी पुढे सांगितले की, प्रभाकर घार्गे यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असली तरी त्यांनी कधीही त्या पदांचा गैरवापर केला नाही. सामान्य जनतेवर कधी दबाव आणला नाही, तर उलट त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढे आले आहेत. घार्गे साहेबांचे नेतृत्व सामान्य जनतेला एकत्र घेऊन पुढे जाणारे आहे, त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत केले जात आहे.
माण आणि खटाव हे दुष्काळग्रस्त तालुके असले तरी प्रभाकर घार्गे यांनी येथे कारखानदारी उभी करून राज्याला दाखवून दिले की दुष्काळातही उद्योगधंदे उभे राहू शकतात. माण तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठीही त्यांचा सतत प्रयत्न आहे. प्रिती घार्गे म्हणाल्या, “आम्ही फक्त घोषणांवर विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्षात काम करून दाखवतो. घार्गे साहेबांचे स्वभाववैशिष्ट्य आहे की, जे बोलतात ते करूनच दाखवतात.”
विधानसभा निवडणुकीत सामान्य जनता घार्गे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. उशिरा उमेदवारी मिळाल्यामुळे प्रचाराला कमी वेळ मिळाला असला, तरीही सामान्य जनता आमच्या सोबत असल्याचे वारंवार कळवत आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. माण-खटावच्या विकासाच्या केवळ गप्पा न मारता, प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता घार्गे साहेबांमध्ये आहे, असेही प्रिती घार्गे यांनी सांगितले.
शेवटी, “विधानसभा निवडणुकीत प्रभाकर घार्गे यांना सहज विजय मिळेल,” असा आत्मविश्वास प्रिती घार्गे यांनी व्यक्त करत या निवडणुकीसाठी घार्गे साहेबांच्या नेतृत्वाला जनतेचा ठाम पाठिंबा असल्याचे पुनः सांगितले.