सातारा जिल्ह्यात म्हसवड पोलीस ठाण्याची ऐतिहासिक कामगिरी जानेवारी 2026 मधील उत्कृष्ट कार्यासाठी चार मानाचे पुरस्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

म्हसवड | प्रतिनिधी

     सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात उल्लेखनीय ठसा उमटवत म्हसवड पोलीस ठाणे यांनी माहे जानेवारी 2026 मध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन होण्याचा मान पटकावला आहे. जनतेच्या हितासाठी, विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रभावी उपक्रमांमुळे म्हसवड पोलीस ठाण्याला एकाच महिन्यात तब्बल चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

       ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या सक्षम नेतृत्वाखालील टीमने सातत्याने, प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने केलेल्या कामातून साध्य झाली आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मासिक क्राईम कॉन्फरन्समध्ये जनहितासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांचा सन्मान करण्यात येतो. जानेवारी 2026 मध्ये म्हसवड पोलीस ठाण्याने या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत जिल्ह्यात आदर्श निर्माण केला.

       या कालावधीत म्हसवड पोलीस ठाण्याने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक शाळा व महाविद्यालयांना भेटी देत मुलींच्या सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती केली. छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या, तसेच एखादी अनुचित घटना घडल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. गुड टच–बॅड टच यासारख्या संवेदनशील विषयांवर प्रभावी प्रबोधन, रोड रोमियोविरोधात कठोर कारवाई आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या ठोस उपायांमुळे म्हसवड पोलीस ठाण्याला जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       यासोबतच महिलांविरोधातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास अवघ्या 24 तासांत पूर्ण करून सर्व सबळ पुरावे गोळा करत माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची उल्लेखनीय कामगिरी म्हसवड पोलीस ठाण्याने केली. नॉन बेलेबल वॉरंट प्रकरणांमध्येही तब्बल 15 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार मिळाला. पीडित महिलेवर मारहाण व विनयभंगाच्या प्रकरणात तात्काळ तपास करून 24 तासांत चार्जशीट दाखल करण्याची तत्परता ही या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

    ही संपूर्ण यशोगाथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह भगवान सजगणे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, सतीश जाधव, विकास ओंबासे, कोमल काळेल आणि ज्योती सरगर यांच्या अथक परिश्रमातून साकार झाली आहे. जनतेचा विश्वास, महिलांची सुरक्षितता आणि जलद न्याय देण्याची बांधिलकी जपत म्हसवड पोलीस ठाणे सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *