तबल्याचा ताल हरपला: उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

नागपूर, १६ डिसेंबर:

तबलावादनाच्या दुनियेतील अजरामर नाव उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. तबल्याच्या जादुई तालांनी जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या महान कलाकाराने अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात झाकीर हुसेन यांची प्रशंसा करत म्हटले की, “महाराष्ट्राच्या या सुपुत्राने तबल्याच्या तालाने जागतिक संगीताला वेगळे परिमाण दिले. त्यांच्या वादनाने तबल्याला स्वतंत्र ओळख दिली आणि भारतीय संगीताला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. तीन पिढ्यांतील कलाकारांसोबत त्यांनी केलेल्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली. त्यांच्या जादुई बोटांमुळे तबल्याचा गोडवा अनुभवायला मिळाला. त्यांच्या जाण्याने एक तेजस्वी तारा निखळला आहे.”

वयाच्या सातव्या वर्षी वडिलांकडून तबलावादन शिकायला सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्याला नवा आयाम दिला. भारतीय संगीताच्या परंपरेला पुढे नेत त्यांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या जुगलबंदीच्या मैफिली रसिकांसाठी नेहमीच अविस्मरणीय ठरल्या.

झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे संगीतविश्वाला मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी होत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!