पंढरपूरमध्ये गुटखाविक्रीवर टाच! – आषाढी यात्रेनिमित्त कारवाईने दुकाने बंद, पालकांकडून कायम बंदीची मागणी
व्हिजन २४तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला म्हसवड)
पंढरपूर (प्रतिनिधी – अदनान कल्यानी):
आषाढी यात्रेनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मावा व गुटखा विक्रेत्यांची दुकाने एकदम बंद दिसून आली. परिणामी, या मावा गुटखा वर अवलंबून असलेले तरुण दिवसभर ते मिळविण्यासाठी धावपळ करताना आढळले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये हॉटेल व मिठाई विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत यात्रेच्या कालावधीत दर्जाहीन अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यासाठी खास ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, अन्न तपासणीसाठी मोबाईल प्रयोगशाळेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान गुटखा, मावा व सुगंधी सुपारी यांची विक्री रोखण्यासाठी खास लक्ष ठेवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक विक्रेत्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. परिणामी, या व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांची मोठी फरपट झाली.
दरम्यान, पालक वर्गाकडूनही आता या व्यसनमूलक पदार्थांच्या कायमस्वरूपी बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. “हे पदार्थ तरुण पिढीचे आरोग्य आणि भवितव्य दोन्ही उद्ध्वस्त करत आहेत, त्यामुळे पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रात त्यांची विक्री पूर्णतः थांबवावी,” अशी तीव्र भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.

