फलटणमध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कार, आरोग्य व मोबाईल वापरावर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज
फलटण,—(प्रतिनिधी
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी संस्कार, आरोग्य व मोबाईलच्या दुष्परिणामांवरील मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात विद्यार्थ्यांना योग्य संस्कारांची जडणघडण, आरोग्याची काळजी आणि मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे होते. यावेळी उपप्राचार्य (माध्यमिक) श्री. ए. वाय. ननावरे, उपप्राचार्य (ज्युनिअर) श्री. सोमनाथ माने, पर्यवेक्षक श्री. रवींद्र नाळे, सौ. पूजा पाटील, श्री. आर. बी. निंबाळकर, तसेच एचओडी सौ. एच. यू. बुचडे, सौ. हेमलता कदम, सौ. कांचन शिंदे (शालेय आरोग्य विभाग प्रमुख) उपस्थित होते.
रणरागिणी संस्थेच्या वतीने माजी प्राचार्या सौ. शाहीन शेख, संचालिका डॉ. सायली बगाडे, संचालिका सौ. रझिया शेख, सचिव मारुती टकले व इमरान सय्यद यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सौ. शाहीन शेख यांनी संस्कार व आरोग्याचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले, तर डॉ. सायली बगाडे यांनी मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांना योग्य वापराचे मार्ग सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कु. तृप्ती विलास शिंदे यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमास ज्युनिअर व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागरूकता, शिस्तबद्ध जीवनशैली आणि मोबाईल वापराबाबत सजगता निर्माण झाली असून, शाळा व संस्थेच्या या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

