मलकापूर येथे महिला विकास मंचच्या 54 व्या महिला मेळाव्याचे भव्य आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते (कराड )
मलकापूर –
श्री मळाई महिला विकास मंच, मलकापूर आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि 54 वा महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शनिवार, 8 मार्च 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता, आदर्श जुनिअर कॉलेज, मलकापूर येथे हा मेळावा संपन्न होणार आहे.
महिला सुरक्षेसाठी सजग पावले…
समाजातील वाढत्या महिला अत्याचार, लैंगिक शोषण, मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना, सायबर गुन्हेगारी, लव जिहाद यांसारख्या गंभीर समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकांच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या सुरक्षिततेविषयीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी हा मार्गदर्शनपर उपक्रम राबवण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अशोकराव थोरात (सचिव, श्री मळाई देवी शिक्षण संस्था, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणे) भूषवणार असून, सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सौ. वैशाली कडूकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“भय इथले संपत नाही” – महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा
या कार्यक्रमात “भय इथले संपत नाही” या विषयावर सखोल चर्चा केली जाणार असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना आणि पालकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या महिला मेळाव्यास मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. अरुणादेवी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. रेखा देशपांडे, कराड निर्भया पथक प्रमुख सौ. दीपा पाटील, भरोसा सेल, कराड शहर पोलीस स्टेशनच्या हसीना मुजावर, तसेच कुसुमताई पुजारी आणि शकुंतला धुमाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
श्री मळाई महिला विकास मंचच्या प्रमुख डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी पंचक्रोशीतील सर्व महिलांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.