रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द (तालुका माण, जिल्हा सातारा) येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शासकीय शालेय जंप रोप क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये चमकदार कामगिरी करत नावाजलेले स्थान मिळवले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून मोठा सहभाग असलेल्या या स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली.
सर्व विजेत्यांना मा. अक्षय सोनवणे (ए.पी.आय., दहिवडी पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते पदक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा जंप रोप असोसिएशनचे सचिव श्री. नितीन सूर्यवंशी, गुरुकुल क्रीडा प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री. सुनील जाधव, आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
खेळाडूंच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. प्रभाकर देशमुख, मुख्याध्यापक एन. डी. नदाफ, तसेच शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामध्ये क्रीडा शिक्षक श्री. सादिक शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या पुढील विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देत गोंदवले खुर्द विद्यालयाने आपल्या गुणवत्तेचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.