दहिवडी कन्या विद्यालयात ‘पोलीस काका दिदि ‘ उपक्रम अंतर्गत मुलींना गुड टच-बॅड टचचे मार्गदर्शन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी, 28 सप्टेंबर:
दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्या विद्यालयात ‘पोलीस काका दिदी ‘ उपक्रमाच्या माध्यमातून आज 1008 मुलींना गुड टच आणि बॅड टच याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमामध्ये मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे महत्त्व पटवून देत स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले. विशेषकरून, प्रशिक्षक नवनाथ भिसे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत मुलींना कराटेचे धडे दिले. तसेच, करिअर मार्गदर्शन आणि संकटाच्या वेळी डायल 112 किंवा अभया प्रकल्पाचा उपयोग कसा करावा, याबाबतही विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला ‘पोलीस काका दिदि’ म्हणून ओळखले जाणारे चंदनशिवे मेजर आणि रासकर मॅडम उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीत या उपक्रमाने मुलींना आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मुलींना मार्गदर्शन करत गुड टच आणि बॅड टच यातील फरक समजावून सांगितला. त्याचप्रमाणे, कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास पोलिसांना कसे संपर्क साधायचे, याबद्दलही विद्यार्थिनींना जागरूक केले.
संपूर्ण कार्यक्रमाने मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले