म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी देवस्थान महिमा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
महाराष्ट्र राज्यातील तिर्थक्षेत्रात दक्षिण काशी व असंख्य भाविकांचे कुलदैवत म्हणुन म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थान सर्वत्र परिचित आहे.
या देवस्थानचा तब्बल एक महिन्याच्या कालावधीतील शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिपावलीस आज ( सोमवार ता.२ डिसेंबर) रथ नगरप्रदक्षणा मिरवणुक यात्रेने होणार आहे.
त्यानिमित्त या देवस्थानची महती सांगणारा लेख...
महाराष्ट्र,आंध्र,कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्री. सिध्दनाथ देवस्थान हे कुलदैवत आहे.
म्हसवड येथील माणगंगेच्या तीरावर श्री.सिद्धनाथांचे इ.स. दहाव्या शतकात हेमांडपंथी, भव्य दगडी बांधकामातील सुंदर असे हे मंदिर आहे. मंदिरातील मुख्य गाभा-यातील श्रीच्या मुर्ती खालील भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवलिंग आहे.
शिवाचे रक्षक म्हणून श्री. सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी हे म्हणुन मानले जातात.
श्री.सिद्धनाथ,भैरवनाथ,सिद्धेश्वर,कालभैरव,महाकाळ, शिदोबा आदी नावानेही देवाचा उल्लेख केला जातो.
श्रीधर स्वामींच्या ‘काशिखंड’ या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली? त्यासंबंधीचिया उल्लेखात ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? असा वाद एकदा त्रैलोक्यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. शिवाच्या अधिन सर्व काही असते त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला.हा निषेध ऐकून शिवशंकरांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूजदंडापासून महाकाळ म्हणजेच काळभैरवांची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिवश्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. मंदीरामधील भुयारात शिवलिंग आहे वर्षातून एकवेळ म्हणजे प्रत्येक वर्षी फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले असते.
शिवरात्र संपल्यावर भुयार वर्षभर कुलुप बंद ठेवण्यात येत असते.
या बंद भुयाराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून त्यावरील गाद्यांवर श्री. सिद्धनाथ व
यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायम वर्षभर ठेवलेल्या असतात.
भुयारातील स्वयंभू शिवपिंडीच्या बरोबर मध्यावर असणार्या गाभार्यातील सिंहासनावर श्री.सिद्धनाथ व जागेश्वरी देवी यांच्या ‘गडकी’ शिलेवर कोरलेल्या व अप्रतिम कोरीव काम केलेल्या रेखीव मूर्ती उभ्या आहेत. बाहेरील भागात अनेक देव-देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेर उजव्या बाजूस वेगळे शिवलिंग आहे. त्याच्या शेजारी असलेल्या नंदीजवळील भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख पाहवयास मिळतो. शिलालेखाची लिपी मध्यमयुगीन कन्नड आहे. प्रारंभीचा मंगलश्लोक आणि शेवटचा आशीर्वादात्मक श्लोक हे संस्कृतमध्ये आहेत. उर्वरित सर्व मजकूर कन्नड भाषेत आहे. हा शिलालेखात इ.स.११४८ साली कल्याण चालुक्य चक्रवर्ती जगदेकमल्ल (दुसरा) या राजाच्या कारकिर्दीतील कारागिरांनी कोरलेला आहे हे स्पष्ट होते. व या राजाने म्हसवड येथील जमीन सिद्धेश्वर देवास दान दिली, असा उल्लेख या शिलालेखात आढळतो.
श्री सिद्धनाथ मंदिरात परंपरेनुसार कार्तिक शुद्ध एक (दिवाळी पाडवा) या दिवशी पहाटे गाभार्याजवळ असणार्या म्हातारदेवापुढे मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत श्रीची घटस्थापना केली जाते. म्हसवड गावात व इतरत्र श्री नाथांना कुलस्वामी मानणारे भक्त आपापल्या घरी घटस्थापना करतात.
हे घट बारा दिवसांचे असतात.
सर्व पुजारी व भाविक या काळात १२ दिवस उपवास करून श्रींची भक्ती करतात, याला नवरात्र म्हणतात. दुर्गादेवीचे नवरात्र ९ दिवसांचे असते.मात्र,श्री सिद्धनाथांचे हे नवरात्र १२ दिवसांचे असते. घटस्थापनेपासून नवरात्रारंभ होतो. याच दिवशी दुपारी १२ वाजता श्रींचा हळदी-समारंभ होतो.
श्री.सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हळदी लावण्याच्या कार्यक्रमात येथील गुरव समाज, गावातील तसेच परगावच्या हजारो महिला सहभागी होतात.
ढोल,सनई-चौघडा,बँड यांच्या मंगल सुराच्या वाद्यात हा हळदी समारंभ संपन्न होतो.
दिपावलीच्या बाहुबिजेस सालकरी मानकरी यांची सायंकाळी मिरवणुक फटाक्याच्या आतषबाजीत काढण्यात येते यास “दिवाळी मैदान” असे म्हणतात.
दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर घट स्थापना केली जाते त्यानंतर सलग बारा दिवस उपवास करून येथील गुरव समाज, शहरातील महिला-पुरूष,अबालवृद्ध पहाटे चार वाजल्यापासून कार्तिक स्नान करून माणगंगेच्या पात्रातून संपूर्ण नगरप्रदक्षिणा घालतात. मंदिरात काही पुजारी व भक्तगण १२ दिवस अहोरात्र उभे राहून श्रींची उपासना करतात. याला ‘उभे नवरात्र’ म्हणतात. ही परंपरा अव्याहत, अखंडपणे सुरु आहे.यंदाही या उक्रमात यंदा भावुक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्तिक शुद्ध १२ (बारस-तुलसी विवाह)रोजी रात्री साडेअकरा वाजता मंदिराच्या बाहेरील पाषाण हत्तीशिल्प मंडपातील सुशोभित केलेल्या हत्तीवरील अंबारीत बसवण्यात आलेली श्रींची मूर्ती विवाहासाठी मंदिराचे मुख्य पुजारी मंदिराच्या गाभार्यात नेतात.गाभार्यात जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरुन मंगलाष्टकांसह पारंपारिक, धार्मिक,विधीपूर्वक,शास्त्रोक्त पद्धतीने रात्री १२ वाजता मोठ्या थाटाने श्री.सिद्धनाथ जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो.बाहेरील हत्ती मंडपातून श्री.सिद्धनाथांची मूर्ती गाभार्यात नेत असताना हजारो भाविक भक्तीभावाने मूर्तीस स्पर्श करण्यास धडपडत असतात, कारण श्रींच्या मूर्तीस स्पर्श झाल्यावर संपूर्ण वर्ष सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जाते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रस्सीखेच होवून श्रींची मूर्ती गाभार्यात नेली जाते व नंतर पुरोहितांमार्फत धार्मिक विधीनुसार श्रींचा शाही विवाह सोहळा संपन्न होतो.
सिद्धनाथ मंदिरातील मुख्य पुजारी-सालकरी असतात. ते वर्षभर संन्यस्त राहून सकाळ-संध्याकाळ शुचिर्भूत होवून श्रींना पंचामृत व गरम उदकाने स्नान, दररोज विविध अवतारातील पूजा, पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी साडेआठ वाजता मुख्य आरती, दुपारी तीन वाजता धुपारती, रात्री साडेआठ वाजता मुख्य आरती व रात्री दहा वाजता शेजारती अशी दिवसातून पाच वेळा श्रींची आरती अखंडपणे सुरू असते.
सालकरी यांना भाविक पूज्य मानतात. हे एक वर्षभराचे अत्यंत कडक व कठीण असे व्रत आहे. साल करणार्यांना अतिशय कडक व कठीण नियमांचे तंतोतंत पालन करावे लागते. साल करणाराचा विवाह होणे आवश्यक असते. अविवाहितास साल करता येत नाही. साल हे वैशाख शुद्ध पौर्णिमेस दरवर्षी बदलत असते. एकदा साल सुरु झाले की साल करणाराने वर्षभर ब्रह्मचर्य पाळावे लागते. सकाळ – संध्याकाळ सुचिर्भूत होवून देवाचे स्नान घालणे, पूजा बांधणे, आरती करणे हा सर्व धार्मिक विधी सालकर्यांना वर्षभर अखंडपणे, नियमितपणे व अगदी ठरलेल्या वेळेवरच करावा लागतो.सालकर्यांनी वर्षभर पांढरे धोतर, पांढरी बाराबंदी, पांढरा फेटा व खांद्यावर उपरणे याच पेहेरावात रहायचे असते. वर्षभर पायात चप्पल घालायची नसते. त्याऐवजी लागडी खडावा वापरावयाच्या असतात. वर्षभर कितीही महत्वाचे अगदी कोर्टाचे काम असले तरी गावाची वेस ओलांडून जायचे नसते. वर्षभर केस कापायचे नाहीत. दाढी करायची नाही आणि विशेष म्हणजे कोणालाही नमस्कार करावयाचा नसतो. कारण सालकरी म्हणजे देवअवतार मानले जातात.वर्षभर सकाळी व रात्री मुख्य आरती झाल्यानंतर सालकर्यांच्या घरचा नैवेद्य श्रींना त्यांच्याच हस्ते दाखवला जातो.वर्षभर मंदिरातच वास्तव्य करावयाचे असते.घर,संसार, प्रपंच,मुले-बाळे हे काहीही सालकर्यांनी पहावयाचे नसते. अशाप्रकारे अत्यंत कडक व कठीण नियमांचे पालन करुन श्रींची सेवा करावयाचे हे एक कडक वृत्त आहे.
येथील गुरव व भाविकांनी श्री सिद्धनाथ मंदिराचे पावित्र्य वर्षानुवर्षे अखंडपणे व अव्याहतपणे जोपासले आहे. गावाचे व भाविकांचे एकमेव श्रद्धास्थान असणारे हे सिद्धनाथ मंदिर त्यामुळेच एक जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.
मानवी समाजामध्ये ज्या पद्धतीने हळदी-समारंभ, विवाह व नंतर वरात आदी कार्यक्रमांनी विवाह सोहळा संपन्न होतो, त्याच पद्धतीने येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ, विवाह व वरात हे कार्यक्रम संपन्न होतात. दिवाळी पाडव्यादिवशी हळदी समारंभ पार पडला.त्यानंतर कार्तिक शुद्ध १२ तुलसी विवाहादिवशी श्रींचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि आज देवदिपावली( मार्गशीर्ष शुद्ध एक सोमवार ता.२ डिसेंबर रोजी) विवाहानंतरची ‘वरात’ म्हणजेच श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची रथयात्रा संपन्न होत आहे.