म्हसवड : राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले म्हसवड येथील श्री सिध्दनाथ ,माता जोगेश्वरी यांच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी (ता.2) मंदीरात श्रींची घटस्थापना विधीपूर्वक आरती करून सालकरी यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
कार्तिक प्रतिपदा ते मार्गशिर्ष महिन्यातील प्रतिपदा दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा हा मंगलमय विविध धार्मिक उपक्रमांनी शाही विवाह सोहळा संपन्न होत असतो. शनिवारी दिपावली पाडव्यास( शनिवार 2/11/24) घटस्थापना,बारा दिवसांच्या नवरात्राचा शुभारंभ व दहा वाजता हळदीचा कार्यक्रम व भाऊबिजेच्या (रविवार दि.3) सायंकाळी दिवाळी मैदान, तुलसी विवाह( बुधवार दि.13) रोजी रात्री 12 वाजता श्रीं चा विवाह सोहळा व विवाह सोहळ्यानंतर देवदिवाळीस ( सोमवार .2 डिसेंबर ) रथयात्रा म्हणजे वधू -वरांची विवाहानंतरची वरात, रथातून काढून या शाही विवाह सोहळ्याची सांगता केली जाणार आहे. दिपावली पाडव्यास शनिवारी (.2 नोव्हेंबर ) प्रातकाळी मंदीरामधील मुख्य गाभा-याबाहेरील गरुड खांबाशेजारी, श्री म्हातारदेव मुर्तीच्या समोर मंदीराचे सालकरी महेश गुरव यांचे हस्ते व मंदीराचे पुजारी,मानकरी यांचे उपस्थितित घटस्थापना करण्यात येणार आहे. परंपरागत प्रथेनुसार श्रींच्या मुर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम त्याच दिवशी( शनिवारी) सकाळी दहा वाजता होईल .यावेळी मंदीरातील हत्ती मंडपात सालकरी महेश गुरव व त्यांची पत्नी सौ.शुभांगी, परटीण ,कुरवली समवेत चार सुहासिनी महिलां,श्रीचे पाळेकरी पुजारी,गुरव,घडशी व डवरी इत्यादी समवेत पारंपारिक पध्दतीने संपन्न होताच श्रींच्या वर व वधू उत्सव मुर्तींना स्नान घालून त्या पुर्ववत मुख्य गाभा-यातील श्रींच्या मुख्य मुर्तीनजिक स्थानापन्न करण्यात येणार आहेत. श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्यातील हळदी लावण्याच्या कार्यक्रमास भाविक विशेत: महिलांची उपस्थिती मोठ्या लक्षणीय संख्येने असते.
हळदी लावण्याचा कार्यक्रम संपन्न होताच सालकरी पुजारीसह भाविकांच्या पारंपरिक पध्दतीने बारा दिवसाच्या नवरात्री उपवासा समवेतच संपूर्ण नगरप्रदक्षणा उपक्रमास प्रारंभ करण्यात करण्यात येणार आहे. या नगरप्रदक्षणा उपक्रमात प्रत्येक वर्षी सुमारे पाचशेहून अधिक संख्येने भाविक सहभागी होतात. सलग बारा दिवस हा उपक्रम सुरु राहतो. रविवारी भाऊबिजेस सायंकाळी ‘दिवाळी मैदान’ मिरवणूकीपुढे फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीचा कार्यक्रम होतो. या शाही विवाह सोहळ्या निमित्त येथील राज बागेतील श्री.म्हातारदेव मंदीरात सालकरी, मानकरी भेटीचा मिरवणूकीने जाण्याचा कार्यक्रम संपन्न होताच या मिरवणुकीने हे दिवाळी मैदान मंदीराकडे प्रस्थान होते .या मिरवणुकीसमोर फटाक्यांची आतषबाजी करुन ठिकठिकाणी स्वागत केले जाते. बुधवारी (दि.13)नोव्हेंबर तुलसी विवाहा दिवशी रात्री बारा वाजता श्रींचा शाही मंगल विवाह सोहळा संपन्न होणार आहे. शनिवारी (ता.23) नोव्हेबर काळ भैरव अष्टमी, मंदीरात साजरी केली जाणार असुन या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस सोमवार ( ता.2 डिसेंबर) श्रीच्या मुर्तींची रथातून मिरवणूकीने केली जाणार आहे. या पारंपारिक रथ मिरवणूक यात्रेच्या कार्यक्रमास प्रत्येक वर्षी राज्यासह परराज्यातील सुमारे पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते